सांगली : मराठा आरक्षणासाठी राजीनाम्याची आग्रही मागणी मराठा समाजाकडून होताच जिल्ह्यातील खासदारांसह सर्व आमदारांनी सोमवारी एक दिवसाचे उपोषण करण्याचे मान्य केले. मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे-पाटील यांचे उपोषण सुरु आहे. या पार्श्वभूमीवर रविवारी जिल्हाधिकारी कार्यालयात कालवा समितीच्या बैठकीसाठी पालकमंत्री सुरेश खाडे यांच्यासह खासदार, आमदार उपस्थित होते. यावेळी समाजाच्या पदाधिकाऱ्यांनी लोकप्रतिनिधींना जाब विचारत मराठा आरक्षणासाठी राजीनामा द्यावा, अशी मागणी केली.

मराठा आरक्षणप्रश्नी सांगली जिल्ह्यातील लोकप्रतिनिधिंना मराठा समाजाने धारेवर धरले. बैठकीत मंत्री, खासदार आणि आमदारांवर प्रश्नांचा भडिमार करण्यात आला. बैठकीला पालकमंत्री सुरेश खाडे, खासदार संजयकाका पाटील, आमदार अनिल बाबर, आमदार विश्वजीत कदम, आमदार गोपीचंद पडळकर, आमदार सुमनताई पाटील, आमदार विक्रम सावंत, आमदार अरुण लाड, विशाल पाटील आदी यावेळी उपस्थित होते. यावेळी मराठा समाजाच्या पदाधिकाऱ्यांकडून आरक्षणबाबत स्पष्ट भूमिका जाहीर करा तसेच आरक्षणासाठी राजीनामा देणार की नाही ? अशी थेट विचारणा मंत्री, आमदार व खासदारांना करण्यात आली.

हेही वाचा : सातारा : मराठा आंदोलकांकडून पालकमंत्री शंभूराज देसाई धारेवर

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

मनोज जरांगे-पाटील यांचे उपोषण सोडवण्यासाठी आमदार-खासदार काय करणार आहेत की नाही ? मराठा आरक्षण प्रश्नी चार दिवसांत निर्णय घ्यायला सांगा. होत नसेल तर सांगली जिल्ह्यातील आमदार व खासदारांना ४ दिवसांत राजीनामा देण्याचा निर्णय जाहीर करण्याची आग्रही मागणी करण्यात आली. सरकारला एक दिवसाचे अधिवेशन घेण्यासाठी सांगली जिल्ह्यातील आमदार पत्र देणार, अशी ग्वाही आमदार विश्वजित कदम यांनी दिली. मनोज जरांगे-पाटलांच्या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी सांगली जिल्ह्यातील सर्वपक्षीय खासदार-आमदार उद्या (दि. ३० ऑक्टोबर, सोमवारी) शहरातील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यासमोर उपोषण करतील, असे लोकप्रतिनिधींच्यावतीने सांगण्यात आले.