सांगली : मिरज रेल्वे पूलाखाली विक्रीसाठी आणलेला गांजा आणि नशेच्या गोळ्या असा सुमारे अडीच लाखाचा अंमली पदार्थाचा साठा स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाच्या पथकाने जप्त केला असल्याची माहिती पोलीस निरीक्षक सतीश शिंदे यांनी शनिवारी दिली. या प्रकरणी एका तरूणाला अटक करण्यात आली आहे.

मिरज कोल्हापूर मार्गावरील रेल्वे उड्डाण पूलाखाली गांजा विक्रीसाठी तरूण थांबला असल्याची माहिती स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाला मिळाली होती. या माहितीच्या आधारे सहायक निरीक्षक पंकज पवार, कर्मचारी अनिल ऐनापुरे, सुनिल जाधव, अभिजित ठाणेकर, कुबेर खोत आदींच्या पथकाने इम्रान उस्मान सनदे (वय ३०, रा. विजयनगर महांकाली साखर कारखान्यासमोर कवठेमहांकाळ) याला ताब्यात घेउन झडती घेतली असता त्याच्याजवळ असलेल्या सॅकमध्ये गांजा व नशेच्या गोळ्या आढळून आल्या.

हेही वाचा : संजय राऊत आधी मोदींना म्हणाले औरंगजेब, आता तुलना थेट शोलेतल्या गब्बरशी, म्हणाले; “लोक त्यांना..”

त्याच्याकडे असलेल्या सॅकमध्ये २ लाख ३६ हजाराचा ७ किलो ८६८ ग्रॅम गांजा आणि नायट्रावेट-१० एन या कंपनीच्या ७२० नशेच्या गोळ्या मिळाल्या. या गोळ्यांची किंमत सहा हजार रूपये आहे. जादा दराने विक्री करण्यासाठी हा अंमली पदार्थांचा साठा धारवाडमधील जावेद नावाच्या व्यक्तीने दिल्या असल्याची कबुली त्यांने पोलीसांना दिली. या प्रकरणी महात्मा गांधी चौक पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.