सांगली : गरम मसाले, विद्युत साहित्य विक्री करणाऱ्या वितरक कंपनीने १५ कोटी १२ लाखांचा मूल्यवर्धित कर (व्हॅट) गेल्या सात वर्षांत चुकवला आहे. याबद्दल सावळी (ता. मिरज) येथील महालक्ष्मी डिस्ट्रिब्युटर्सच्या राजेंद्र भंवरलाल लड्डा व सुशांत राजेंद्र लड्डा (रा. शिवरत्न कॉम्प्लेक्स, कॉलेज कॉर्नर) यांच्याविरुध्द कुपवाड औद्योगिक पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सात वर्षांत १५ कोटी १२ लाख ५३ हजार ९६३ रुपयांचा मूल्यवर्धित कर अर्थात ‘व्हॅट’ चुकवल्याबद्दल कुपवाड एमआयडीसी पोलिसांत गुन्हा दाखल झाला आहे. याबाबत जीएसटीचे राज्य कर निरीक्षक वैभव माने यांनी फिर्याद दिली आहे.

हेही वाचा : “देवेंद्र फडणवीस आणि जिमचा काही संबंध नाही”, आदित्य ठाकरेंचा फडणवीस यांना टोला

अधिक माहिती अशी, राजेंद्र लड्डा व सुशांत लड्डा यांची मे. महालक्ष्मी डिस्ट्रिब्युटर्स नावाने कंपनी आहे. त्यांचा गरम मसाले, प्लास्टिक ग्रॅन्युअल्स व इलेक्ट्रिक वस्तू विक्रीचा व्यवसाय आहे. त्यांच्या कंपनीच्या व्यवसायाचे ठिकाण सावळी येथे आहे. हा व्यवसाय त्यांनी मूल्यवर्धित कर कायदा २००२ अंतर्गत नोंदवला होता. लड्डा यांनी व्यापार करताना १ एप्रिल २००७ ते ३१ मार्च २०१४ या कालावधीत व्हॅट आणि त्याची शास्ती अशी १५ कोटी १२ लाख ५३ हजार ९६३ रुपये रक्कम चुकवली होती.व्हॅट चुकवल्याबद्दल फेब्रुवारी २०२२ व एप्रिल २०२३ मध्ये दोनवेळा नोटीस बजावण्यात आली होती. नोटिशीला त्यांनी कोणतेही उत्तर दिले नाही. खुलासाही केला नाही. त्यामुळे निरीक्षक माने यांनी व्हॅट कायद्यानुसार १५ कोटी १२ लाख ५३ हजार ९६३ रुपयांचा व्हॅट चुकवल्यामुळे दोघांविरुद्ध गुन्हा नोंदवण्यात आला आहे.