सांगली : लोकसभा निवडणुकीतील अपक्ष म्हणून दाखल केलेली उमेदवारी विशाल पाटील यांनी मागे घ्यावी यासाठी काँग्रेस आणि उबाठा शिवसेनेकडून राजकीय दबाव आणण्याचे मोठे प्रयत्न आज दिवसभर सुरू होते. उद्या सोमवारी दुपारनंतरच महाविकास आघाडीत होऊ घातलेली बंडखोरी टळणार की चुरशीची लढत होणार हे स्पष्ट होणार आहे.
महाविकास आघाडीतून काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष विशाल पाटील उमेदवारीसाठी अखेरपर्यंत प्रयत्नशील होते. त्यांच्या उमेदवारीसाठी जिल्ह्यातील काँग्रेसचे सर्व नेते एकजुटीने प्रयत्नशील असताना जागा वाटपात सांगलीची जागा उबाठा शिवसेनेला मिळाली. यामुळे शिवसेनेने चंद्रहार पाटील यांना उमेदवारी देउन त्यांची उमेदवारीही आघाडीच्या सर्व नेत्यांना सोबत घेउन दाखल केली. दरम्यान विशाल पाटील यांनीही काँग्रेस व अपक्ष उमेदवारी दाखल केली असून काँग्रेसचा एबी फॉर्म नसल्याने आता अपक्ष उमेदवारी रिंगणात आहे.
हेही वाचा : “मुलाला मुख्यमंत्री करण्यासाठी उद्धव ठाकरेंना कोंडून ठेवलं”, रश्मी ठाकरेंबाबत सदा सरवणकरांचं मोठं विधान!
पाटील यांनी अपक्ष उमेदवारी मागे घ्यावी यासाठी काँग्रेस आणि उबाठा शिवसेनेच्या वरिष्ठ नेत्यांकडून जोरदार प्रयत्न आज दिवसभर सुरू होते. काँग्रेसचे जेष्ठ नेतेही विशाल पाटील यांच्याशी आज चर्चा करणार असल्याची माहिती मिळाली. अपक्ष उमेदवारी मागे घेतली तर विधानपरिषद अथवा राज्यसभा सदस्य होण्याची संधी देण्याची तयारीही दर्शवली जात आहे. मात्र, पाटील यांनी अपक्ष मैदानात राहावेच असा कार्यकर्त्यांचाही प्रचंड दबाव असून आघाडीच्या प्रस्तावाला अद्याप पाटील यांच्याकडून होकारार्थी प्रतिसाद मिळालेला नाही. उद्या उमेदवारी मागे घेण्याची अंतिम मुदत असून दुपारी तीन वाजेपर्यंत यावर चर्चा सुरूच राहणार आहे.महाविकास आघाडीतील विशाल पाटील यांची बंडखोरी होते की, बंड थंड होते याकडे जिल्ह्यातील सर्वांचे लक्ष लागले आहे.