सांगली : देवाच्या नावाखाली शेतकर्‍यांच्या घरावर जर कोणी नांगर फिरवत असेल तर देवही माफ करणार नाही असे सांगत शक्तीपीठ महामार्गाला आपला विरोध असल्याचे सांगत शिवसेनेचे खासदार धैर्यशील माने यांनी शनिवारी सरकारला घरचा आहेर दिला. याबाबत आपण मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याशी चर्चा करु असेही काँग्रेसच्या आंदोलनावेळी म्हणाले.

शेतकर्‍यांना भूमीहिन करुन महापूराचा धोका वाढविणारा प्रस्तावित शक्तीपीठ महामार्ग रद्द करावा या मागणीसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर काँग्रेसने आंदोलन केले. यावेळी सुरु असणार्‍या आंदोलनावेळी शनिवारी पालकमंत्री सुरेश खाडे यांची  मोटार अडवण्यात आली. आंदोलनामध्ये काँग्रेसचे खासदार विशाल पाटील, आ. डॉ. विश्‍वजित कदम, शहर जिल्हाध्यक्ष पृथ्वीराज पाटील, राष्ट्रवादीचे आ. अरूण लाड, शिवसेनेचे खासदार धैर्यशील माने, जनसुराज्य शक्तीचे प्रदेशाध्यक्ष समित कदम हेही सहभागी झाले होते. यावेळी बोलताना आ.डॉ. कदम यांनी सांगितले, प्रस्तावित महामार्गाला होणारा विरोध पाहता हा महामार्ग रद्द व्हावा अशी आमची मागणी आहे. शासनाने सध्या भूसंपादनास स्थगिती दिली असली तरी महामार्ग रद्द केलेला नाही. रद्दचा निर्णय होईपर्यंत काँग्रेस या मागणीसाठी आग्रही राहील असे सांगितले.

हेही वाचा : मराठा – ओबीसी संघर्षास शरद पवार जबाबदार – उदयनराजे

यावेळी बोलताना शिवसेनेचे खा. माने म्हणाले, महामार्ग रद्द  व्हावा यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याशी चर्चा केली जाईल, संसदेतह याबाबत प्रश्‍न उपस्थित करू. देवाच्या नावाखाली शेतकर्‍यांच्या घरावर जर कोणी नांगर फिरवत असेल तर देवही माफ करणार नाही असे सांगत शक्तीपीठ महामार्गाला आपला विरोध असल्याचे सांगितले. राज्यातील बारा जिल्ह्यातून ८०२  किलोमीटरचा प्रस्तावित असलेला शक्तिपीठ महामार्ग सांगली जिल्ह्यातील एकोणीस गावातुन जात आहे.यासाठी २७ हजार ५०० हेक्टर जमिन संपादित केली जाणार आहे.

हेही वाचा : सांगली, रत्नागिरी शहरी बस सेवेच्या प्रवासी भाड्यात महिला, ज्येष्ठांना सवलत

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

हा मार्गामुळे सांगली जिल्ह्यातील १९ गावातील पाच हजार शेतकरी बाधित होणार आहेत.  मिरज तालुक्यातील गावांना महापुराचा धोका मोठ्या प्रमाणात उद्भवणार आहे. या महामार्गासाठी कर्नाळ पासुन कोल्हापूर जिल्ह्यातील शिरोळ तालुक्यातील गावांपर्यंत भराव पडल्यास पावसाळ्यात कृष्णा आणि वारणा नद्यांचे पाणी पात्राबाहेर आल्यानंतर ते लवकर हटणार नाही. दुर्दैवाने महापुर आलाच तर सांगली शहर व परिसरातील गावांना फार मोठा फटका बसणार आहे.यामुळे हा महामार्ग रद्द करण्याची आग्रही मागणी होत आहे.