लोकसत्ता प्रतिनिधी

सांगली: अल्पवयीन मुलीला खाऊ देण्याच्या आमिषाने बोलावून लैंगिक अत्याचार केल्या प्रकरणी दोन वृध्द भावांना २५ वर्षे सश्रम कारावास आणि दहा हजार रूपये दंडाची शिक्षा जिल्हा सत्र न्यायाधीश डी. एस. हातरोटे यांनी गुरूवारी सुनावली.

यशवंत मारूती ऐवळे (वय ६५) आणि निवास मारूती ऐवळे (वय ५८ रा. शिवाजीनगर कडेगाव) या दोन भावांना बलात्कार, लहान मुलांचे लैंगिक अत्याचार प्रतिबंधक कायद्यानुसार ही सजा ठोठावण्यात आली. मे २०२० मध्ये वरिष्ठ भावाने एका अल्पवयीन मुलीला खाऊचे आमिष दाखवून ऊसाच्या शेतात नेउन लैंगिक अत्याचार केले होते, तर दुसर्‍यांने शेडमध्ये नेऊन अत्याचार केले होते. हा प्रकार कोणाला सांगितलास तर तुला व तुझ्या घरच्यांना ठेवणार नाही अशी धमकीही दिली होती.

हेही वाचा… आधी म्हणाले, “बेडूक कितीही फुगला तरी बैल होत नाही”, आता सूर बदलत म्हणाले, “बच्चू कडू…”

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

मात्र, पिडीता घरी आल्यानंतर तिला शारिरीक त्रास होऊ लागल्याने ही बाब उघड झाली. या प्रकरणी पिडीतेच्या पालकांनी कडेगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला होता. या प्रकरणाचा तपास करून पोलीसांनी दोन्ही भावाविरूध्द जिल्हा सत्र न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले होते.
न्यायालयात दहा जणांच्या साक्षी तपासण्यात आल्या. न्यायालयाने दोघांनाही दोषी ठरवून २५ वर्षे सश्रम कारावासाची शिक्षा गुरूवारी ठोठावली. तर यशवंत ऐवळे याला दहा तर निवास ऐवळे याला ९ हजार रूपये दंड ठोठावण्यात आला.