सांगली : वारंवार होणार्‍या घरगुती वादातून आई व बहिणीने तरूण भावाचा खून करण्याचा प्रकार तासगावमध्ये शनिवारी वैद्यकीय तपासणीनंतर समोर आला. खूनाचा प्रकार लपविण्यासाठी मृताच्या अंगावर कापूर टाकून पेटवून देउन आत्महत्या दर्शवण्याचा प्रयत्नही दोघींनी केला. मात्र, वैद्यकीय तपासणीत डोकीत झालेली जखम निदर्शनास आल्यानंतर या खूनाला वाचा फुटली.

याबाबत माहिती अशी, तासगाव शहरातील कासार गल्लीत वास्तव्य असलेल्या मयूर रामचंद्र माळी याच्या घरात आग लागल्याची घटना शनिवारी दुपारी निदर्शनास आली. नगरपालिकेच्या अग्निशमन यंत्रणेने आगीवर ताबा मिळवत असताना या आगीत मयूर माळी (वय ३०) या तरूणाचा भाजून मृत्यू झाल्याचे प्रथम दर्शनी आढळून आले. मात्र, वैद्यकीय तपासणीमध्ये हा मृत्य डोकीस जबर मार लागल्याने मृत्यू झाल्याचे निष्पन्न झाले. यामुळे पोलीसांनी गांभीर्याने तपास करत खूनाचा प्रकार उघडकीस आणला. या खून प्रकरणी आई संगीता माळी व बहिण काजल माळी या दोघींना पोलीसांनी रात्री उशिरा अटक केली.

मृत मयूर माळी हा सातत्याने आई व बहिणीशी भांडण करत होता. भांडणात कधी कधी मयूर दोघींना मारहाणही करत असल्याचे समजले. यातून माय लेकींनी त्याचा खून करण्याचा निर्णय घेतला. शुक्रवारी रात्री जेवणातून गुंगीकारक पदार्थ खायला दिला. यामुळे तो झोपला असताना डोकीत दगड घालून त्याची हत्या करण्यात आली. यानंतर खून पचविण्यासाठी मृताच्या अंगावर कापूर टाकून पेटवून देण्यात आला. आणि पेटवून घेउन आत्महत्या केल्याचा बनाव रचण्यात आला. मात्र डोकीत झालेला दगडाच्या घावामुळे खून उघडकीस आला. या प्रकरणी दोघीविरूध्द शुक्रवारी रात्री अकरा वाजता पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल करून दोघींना अटक करण्यात आली.