सातारा: जागतिक वारसास्थळ असलेल्या कास पठारावर भरधाव वाहनाच्या धडकेत भेकर हा वन्य प्राणी ठार झाल्याचे आढळून आल्याने एकच खळबळ उडाली. कास पुष्प पठारावरील फुलांचा हंगाम बहरात आला आहे. यामुळे पर्यटकांच्या वाहनांच्या संख्येत लक्षणीय वाढ झाली आहे. दरम्यान, भरधाव वेगाने जाणाऱ्या वाहनाच्या धडकेत भेकर ठार झाले. पारंबे फाटा ते घाटाई फाटा दरम्यान हा अपघात झाला. कास समितीचे वाहन गस्तीवर असताना भेकर मृतावस्थेत आढळून आले. यानंतर भेकराला कास समितीच्या वाहनातून सातारा वनविभागाच्या कार्यालयात आणले. यानंतर पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांनी या भेकराचे शवविच्छेदन केले.

अलीकडच्या काळात रस्ता ओलांडताना झालेल्या अपघातामुळे बिबट्यासह वन्यप्राणी मृत्युमुखी पडण्याच्या घटनांमध्ये दिवसेंदिवस वाढ होत आहे. याबाबत वाहनचालकांनी वन परिसरातून वाहन चालवताना वन्यप्राणी रस्त्यावर येत असतात. यावेळी काळजी घेण्याचे आवाहन वन विभागाने केले आहे.

कास पठार परिसरात रस्ते अपघातात यापूर्वीही अनेक वन्यप्राण्यांना आपला जीव गमवावा लागला आहे. सध्याच्या पर्यटन युगात पर्यटनवाढ अपरिहार्य आहे. परंतु, त्याच वेळी वन्यप्राण्यांचा जीव देखील मोलाचा आहे, याचा विसर पर्यटकांनी पडू देता कामा नये असे आवाहन साताऱ्याचे वनपरिक्षेत्र अधिकारी संदीप जोपळे यांनी केले आहे.

वाहनांची गर्दी

दरम्यान कास पठारावर सध्या फुले उत्सव सुरू आहे. त्यामुळे राज्यभरातून मोठ्या प्रमाणात पर्यटन या फुलोत्सवाचा आनंद घेण्यासाठी येत आहेत. यामुळे कास पठारावर मोठ्या प्रमाणात वाहनांची गर्दी होत आहे. येणाऱ्या पर्यटकांना व वाहन चालकांना कास पठार हा जागतिक वारसा स्थळाचा भाग आहे. या परिसरात मोठ्या प्रमाणात जैव संपदा आहे ही गोष्ट लक्षात येत नाही. याशिवाय हा घाट रस्ता आहे. या परिसरात भरधाव वेगात गाडी चालवता येणार नाही याबाबतची माहिती हे पर्यटक घेत नाहीत. काही पर्यटक उशिरापर्यंत पठारावर थांबतात. रात्री उशिरा निघाल्यानंतर गर्द झाडीतून वन्य प्राणी बाहेर रस्त्यावर येतात किंवा आलेले असतात. त्यांच्या डोळ्यावर प्रखर प्रकाशझोत आल्याने त्यांचे डोळे दिपतात त्यांना पुढचे दिसणे बंद होते अशावेळी भरधाव वेगातील गाडी अशा वन्य प्राण्यांना जोरदार धडक देते. त्यात या वन्य प्राण्यांचा मृत्यू होतो. त्यामुळे पर्यटकांनी कास पठारावर येताना काही स्वतःचे व निसर्गाचे नियम पाळणे गरजेचे असल्याचे मत स्थानिकांनी व्यक्त केले.