सातारा : कास पठारावर आता घुंगरांच्या आवाजात पर्यंटक पठारावरील निसर्गाचा आनंद घेणार आहेत. निसर्ग पर्यटनाला ग्रामीण संस्कृतीची जोड मिळावी या उद्देशाने कास पठारावर फुलांचे दर्शनासोबत निसर्ग भटकंतीसाठी ही बैलगाडीची सफर सुरू करण्यात आली आहे. कुसुंबीमुरा येथील शेतकरी ज्ञानेश्वर आखाडे यांनी आपली बैलगाडी आणत आज सुरुवात केली.
कास पठाराची पर्यटन महती जगभर पोहचविण्यासाठी कासच्या अलौकिक सौंदर्याचा उपयोग करून घ्यायचे नियोजन वन विभागाने केले आहे. कास पठाराच्या पुष्प हंगाम चार सप्टेंबरपासून सुरू झाला आहे. दोन दिवसांपासून पावसाने विश्रांती घेऊन चक्क ऊन पडल्याने फुलांचा बहरही चांगला होवू लागला आहे.
वनविभाग व कास समितीच्या वतीने पर्यटकांसाठी विविध सोयी करण्यात आल्या आहेत. यावर्षी उपवनसंरक्षक अमोल सातपुते यांच्या सूचनेनुसार बैलगाडीची सफर सुरू करण्याचे ठरले होते. त्यानुसार कासवरील पर्यटन पर्यावरणपूरक होण्यासाठी ही बैलगाडी आज मान्यवरांच्या उपस्थितीत सुरू करण्यात आली. यावेळी वनक्षेत्रपाल संदीप जोपळे, वनपाल राजाराम काशीद, वनरक्षक समाधान वाघमोडे, दत्तात्रय हेरलेकर, कास समितीचे अध्यक्ष संतोष आटाळे, उपाध्यक्ष विजय वेंदे, सदस्य ज्ञानेश्वर आखाडे, प्रदीप कदम, तानाजी आटाळे, विठ्ठल कदम आदी उपस्थित होते.
जुन्या राजमार्गावर कुमुदिनी तलावाकडे पर्यटकांना पायी चालत जावे लागते. आता राजमार्ग कार्यालय ते कुमुदिनी या मार्गावर ही बैलगाडी चालणार असून, पर्यटकांना एक वेगळा अनुभव कासवर मिळणार आहे. बैलगाडी बरोबरच विजेवरील गाड्याही सुरू करण्याचे नियोजन असून, कच्च्या रस्त्यांवर या गाड्यांना अडचण येऊ शकते.
जनावरांचा मोठा वाटा…
कास पठारावर ज्या भागात जास्त गुरे चराई होते त्या ठिकाणी फुलांचे प्रमाण चांगले आहे. गुरांचे मलमूत्र खतांच्या रूपाने पठारावर पडण्याबरोबरच त्यांच्या विष्ठेतून, खुरातून फुलांचे बी इकडे तिकडे पसरून फुले सर्वत्र फुलण्यास मदत होते. त्याच पठारावर चरणारे बैल आता बैलगाडीतून पर्यटकांना फिरवण्याचे काम करून पर्यावरण व फुलांची ही दुनिया राखण्यास मदत करणार आहेत.
स्थानिकांना रोजगार
स्वयंचलित वाहनांच्या युगात, बैलगाडीतून प्रवास करणे हा एक वेगळा आणि अविस्मरणीय अनुभव ठरू शकतो. या सफारीतून ग्रामीण भागातील पारंपरिक जीवनशैली, निसर्ग आणि शांतता अनुभवता येते. हे एक प्रकारचे ग्रामीण पर्यटन आहे, जिथे पर्यटक निसर्गरम्य वातावरणाचा आणि ग्रामीण जीवनाचा अनुभव घेतील. उपवनसंरक्षक अमोल सातपुते यांच्या संकल्पनेतून कास पठारावर ग्रामीण भागातील स्थानिकांना रोजगार हा केंद्रबिंदू मानून बैलगाडी सफर सुरू करण्यात आल्याचे वनक्षेत्रपाल संदीप जोपळे यांनी सांगितले.