सातारा: शुक्रवारी मध्यरात्रीपासून शनिवारी दिवसभर माण खटाव या कायम दुष्काळी भागात मोठा पाऊस झाला. त्यामुळे म्हसवड शहरातील बाजारपेठ, सातारा पंढरपूर व शिंगणापूर मुख्य रस्ता पाण्याखाली गेला होता.

मुसळधार पावसाने येथील एस.टी. बस स्थानक ते शिंगणापुर चौक या परिसरात तुडंब पाणी साचून रस्त्यालगतच्या दुकानांमध्ये पाणी शिरल्याने येथील व्यापाऱ्यांचे लाखो रुपयांचे नुकसान झाले. पालिकेने तातडीने दखल घेत पालिका महसूल प्रशासनाने पोलीस बंदोबस्तात गटारीवरील अतिक्रमणे काढून टाकण्याची मोहिम राबविली. ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांनी म्हसवड येथे रात्री भेट दिली. पाणी साठलेल्या परिसराची पाणी केली.

यावेळी त्यांच्यासमोर या समस्येची गाऱ्हाणी नुकसानग्रस्त नागरिक, व्यापाऱ्यांनी मांडली व तातडीने उपाययोजना करण्याची मागणी केल्यामुळे गोरे यांनी पालिका प्रशासनास अतिक्रमण हटविण्याच्या सूचना केल्या. आजच्या या अतिक्रमण विरोधातील मोहिमेत येथील तहसिलदार मिना बाबर, विभागीय पोलिस अधिकारी रणजित सावंत,सहायक पोलिस निरीक्षक अक्षय सावंत, पालिका मुख्याधिकारी डॉ.सचिन माने,महसुल कर्मचारी यासह पालिकेचे कर्मचारी सहभागी झाले होते. शहरात बसस्थानक ते शिंगणापुर चौक रस्त्यावर गर्दीच्या परिसरात अनेक ठिकाणी मोठी अतिक्रमणे झाली होती.

सार्वजनिक बांधकाम खात्याचे गटारीचे बांधकामच अरुंद झाले होते. पावसाच्या पाण्याचा खुप मोठा प्रवाह पाहता मुळात गटार पुरेशी नव्हती. दुकानदारांनी ठिकठिकाणी सिमेंट काँक्रीटचा स्लॅब टाकून गटार झाकून त्यावर खोकी व पत्रा शेड, बांधकामे करुन त्यामध्ये दुकाने थाटली होती. पावसाळ्यापुर्वी साफसफाई करणेही जिकीरीचे होत होते. यामुळे गटार तुंबली गेली. पावसाच्या पाण्याचा निचरा होऊ शकत नव्हता. शनिवारच्या मुसळधार पावसाचे पाणी येथील दुकानांमध्ये शिरले. पालिकेने प्रारंभी अतिक्रमणे धारकांना अतिक्रमण काढून टाकण्याच्या सुचना दिल्या होत्या. यामुळे अनेकांना स्वंफूर्तीने अतिक्रमणे काढली. संबंधितांना पालिका कर्मचाऱ्यांनीही मदत केली.