सातारा: ‘गणपती बाप्पा मोरया’चा जयघोष, वाद्यांचा गजर आणि भक्तांच्या उत्साहात घरगुती आणि सार्वजनिक मंडळांच्या गणरायांचे शनिवारी उत्साहात स्वागत करण्यात आले. दरम्यान, गणेशोत्सवानिमित्त बाजारपेठांमध्ये मोठी गर्दी होती. दुपारनंतर सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाच्या कार्यकर्त्यांची गणेश प्रतिष्ठापनेसाठी गडबड सुरू होती. सातारा शहरातील व जिल्ह्यातील वातावरण भक्तिमय झाले आहे.

शनिवारी पहाटेपासून दुपारपर्यंत घरगुती गणेशमूर्ती स्थापनेचा मुहूर्त दाते पंचांगचे मोहन शास्त्री दाते यांनी दिल्यामुळे घरोघरी मूर्ती प्रतिष्ठापनेची गर्दी गडबड दिसून येत होती. दर वर्षी भाद्रपद शुद्ध चतुर्थी ते भाद्रपद शुद्ध चतुर्दशी दरम्यान साजरा होणाऱ्या गणेशोत्सवाला मोठ्या उत्साहात प्रारंभ झाला. शहरात राजवाडा मोती चौक, पोवई नाका तसेच संगमनगर परिसरात मूर्ती वाजतगाजत घरी नेण्यासाठी, तसेच पूजेसाठी लागणारी पत्री, मोदक, मेवा-मिठाई खरेदीसाठी गणेश भक्तांची मोठी झुंबड उडालेली दिसत होती. ‘गणपती बाप्पा मोरया मंगलमूर्ती मोरया’च्या जयघोषात पूजा करून घरोघरी गणेशमूर्तींची प्रतिष्ठापना करण्यात आली. सातारा शहरातील अनेक सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांनी मागील रविवारपासूनच वाजतगाजत गणेशमूर्ती मंडपस्थळी स्थानापन्न केली आहे. काही मंडळांनी गणेश चतुर्थीच्या दिवशी मूर्ती आणली. आवाजाच्या भिंती लावण्यास बंदी घातल्याने पारंपरिक वाद्यांच्या गजरात घरगुती व सार्वजनिक गणपतींचे आगमन झाले.

हेही वाचा – मातीच्या मूर्तींची होते घरोघरी प्रतिष्ठापना ! सोलापूरजवळील गावांमध्ये वंशपरंपरेने कुंभार समाजाची सेवा

सातारा, वाई, फलटण, कोरेगाव, म्हसवड, महाबळेश्वर, पाचगणी, मेढा, खंडाळा, लोणंद, शिरवळ येथेही घरगुती व सार्वजनिक मंडळांच्या गणेशाचे उत्साहात स्वागत करण्यात आले. पालकमंत्री शंभूराज देसाई यांच्या निवासस्थानी गणरायाचे आगमन झाले. या वेळी रविराज देसाई, यशराज देसाईंसह सर्व कुटुंब उपस्थित होते. राज्यातील जनतेला उत्तम आरोग्य आणि सुखसमृद्धी लाभावी, अशी प्रार्थना देसाईंनी गणपती बाप्पाकडे केली.

खासदार उदयनराजे भोसले यांच्या जलमंदिर पॅलेस येथेही गणपतीची प्रतिष्ठापना झाली. आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनीही मोठ्या उत्साहात प्रतिष्ठापना केली. आमदार मकरंद पाटील यांच्या निवासस्थानी ही गणरायाचे स्वागत करण्यात आले. या वेळी खासदार नितीन पाटील व ज्येष्ठ बंधू मिलिंद पाटील आणि कुटुंबीय उपस्थित होते. त्याचप्रमाणे विधान परिषदेचे माजी सभापती रामराजे नाईक निंबाळकर, आमदार महेश शिंदे, जयकुमार गोरे, शशिकांत शिंदे, दीपक चव्हाण यांनी गणपतीची स्थापना केली.

हेही वाचा – पंढरीत ‘मोरया’च्या जयघोषात गणरायाचे स्वागत

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

पोलीस अधीक्षक समीर शेख यांनी गतवर्षीप्रमाणे याही वर्षी गणपती बाप्पांची प्रतिष्ठापना केली असून, त्यांनी विधिवत पद्धतीने पूजा करत सपत्नीक आरती केली. त्यांच्या निवासस्थानी बाप्पांच्या आगमनामुळे सातारा पोलीस दलातसुद्धा एक चैतन्याचे वातावरण आहे.