राहाता : काही दिवसांपूर्वी शिर्डीत साईबाबा संस्थानच्या दोन कर्मचाऱ्यांची कामावरून घरी जाताना हत्या करण्यात आली होती. ही घटना ताजी असतानाच शिर्डी शहरात दारू पिण्यासाठी पैसे देण्यास नकार दिल्याने ४ तरुणांनी संस्थानच्या कर्मचाऱ्यावर चाकू व लोखंडी रॉडने हल्ला केल्याची घटना घडली. या हल्ल्यात कर्मचारी गंभीर जखमी झाला.

काल, बुधवारी रात्री ही घटना घडली. याबाबत शिर्डी पोलिसांनी ४ जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. कोयता हल्ला, चाकू हल्लासारख्या घटना घडू लागल्याने पोलिसांची डोकेदुखी वाढली आहे. लक्ष्मण साहेबराव झाडे (वय ३१, रा. श्रीरामनगर, शिर्डी) असे जखमी कर्मचाऱ्याचे नाव आहे. लक्ष्मण झाडे घरी जात असताना चौघांनी रस्त्यात अडवून पैसे मागितले. त्यास नकार दिला असता चाकूने वार केले व रॉडने मारहाण करून खिशातील दोन हजार रुपये काढून घेतले. पोलिसांनी अनिकेत पोटे, योगेश गाडे, रोहित चाबुकस्वार, सतीश अनारसे ( चौघेही रा. शिर्डी) या चौघांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.