सोलापूर : एका छोट्या हाॅटेलमध्ये काम करणाऱ्या गरीब महिलेने भिशीच्या माध्यमातून मोठ्या कष्टाने जमा केलेली एक लाख ३० हजारांची रोकड गोड बोलून घेतली आणि नंतर परत न देता उलट त्या महिलेवर प्राणघातक हल्ला केल्याबद्दल एका तरूणाला सोलापूरच्या सत्र न्यायालयाने दहा वर्षे सक्तमजुरीची शिक्षा ठोठावली. तसेच पीडित जखमी महिलेला आरोपीने पाच लाख रूपयांची नुकसान भरपाई देण्याचाही आदेश न्यायालयाने पारित केला आहे.

कृष्णदेव सुखदेव येडगे ऊर्फ कृष्णा ऊर्फ देवदास पाटील (वय २८, रा. कदमवस्ती, मानेगाव, ता. माढा) असे शिक्षा सुनावण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. या खटल्याचा निकाल जिल्हा सत्र न्यायाधीश रेखा पांढरे यांनी जाहीर केला. मोहोळ पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडलेल्या या खटल्याची पार्श्वभूमी अशी की, जखमी महिला एका हाॅटेलमध्ये न्याहरी तयार करण्याचे काम करीत होती. तर आरोपी कृष्णदेव त्या हाॅटेलमध्ये अधुनमधून चहा घेण्यासाठी ग्राहक म्हणून यायचा. तेथे त्याची ओळख जखमी महिलेबरोबर झाली. ओळखीतून कृष्णदेव याने नियमित संपर्कासाठी मोबाइल संच घेऊन दिला होता. ओळखीचे रूपांतर प्रेमात झाले होते.

हेही वाचा : ‘स्वआधार’ला शासनाचा बालस्नेही पुरस्कार; बालकांच्या क्षेत्रातील उत्कृष्ट कार्याची दखल

दरम्यान, जखमी महिलेने मोठ्या कष्टाने भिशीतून एक लाख ३० हजार रूपये जमा केल्याचे आरोपी कृष्णदेव यास समजले. तेव्हा गोड बोलून त्याने जखमी महिलेकडून थोड्याच दिवसांत परत देण्याच्या अटीवर एक लाख ३० हजारांची रक्कम उकळली. परंतु नंतर मुदत संपूनही रक्कम परत करण्यास त्याने टाळाटाळ केली. दरम्यान, जखमी महिलेने आपल्या घराचे बांधकाम सुरू केल्याने पैसे परत मिळण्यासाठी तगादा लावला असता आरोपी कृष्णदेव याने ६ सप्टेंबर २०२१ रोजी सायंकाळी तिला पैसे परत देतो म्हणून मोटारीतून नेले. सावळेश्वर टोल नाका ओलांडून पुढे एका गावाजवळ रात्री अंधारात मोटार थांबविली आणि अचानकपणे आरोपी कृष्णदेव याने मोटारीच्या पाठीमागील डिक्कीतून धारदार हत्यार काढले आणि महिलेला मोटारीतून ओढत बाहेर काढून तिच्यावर सपासप वार केले. गंभीर जखमी होऊन बेशुध्दावस्थेत महिला रक्ताच्या थारोळ्यात रस्त्याच्या कडेला पडली असता तेथे गावकरी जमा झाले.

हेही वाचा : संतश्रेष्ठ गोरोबाकाका मंदिर व परिसरात १३ कोटींची विकास कामे, निधी उपलब्ध झाल्याने निविदा प्रक्रिया सुरू

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

पोलिसांनी जखमी महिलेला सोलापूरच्या छत्रपती शिवाजी महाराज सर्वोपचार शासकीय रूग्णालयात दाखल केले. शुध्दीवर आल्याने तिने दिलेल्या मृत्युपूर्व जबाबानुसार मोहोळ पोलीस ठाण्यात आरोपीविरूध्द गुन्हा दाखल झाला होता. पोलीस उपनिरीक्षक एस. जी. खारगे यांनी गुन्ह्याचा तपास पूर्ण केला. खटल्यात जिल्हा सरकारी वकील प्रदीपसिंह राजपूत यांनी सरकारतर्फे १८ साक्षीदार तपासले. आरोपीतर्फे ॲड. आर. बी. बायस यांनी बचाव केला.