सोलापूर : उल्हासनगरच्या हिल लाईन पोलीस ठाण्यात पोलीस निरीक्षकाच्या दालनातच भाजपचे आमदार गणपत गायकवाड यांनी शिवसेना नेते महेश गायकवाड यांच्यावर केलेल्या गोळीबाराच्या घटनेनंतर उपमुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या राजीनाम्याची मागणी राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या नेत्या खासदार सुप्रिया सुळे यांनी केली आहे. परंतु या मागणीवर उत्तर द्यायला आपण बांधील नाही, अशा शब्दांत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी भाष्य केले आहे.
शनिवारी सोलापुरात अजित पवार यांनी एका पत्रकार परिषदेत बोलताना, खासदार सुप्रिया सुळे यांनी उपमुख्यमंत्री फडणवीस यांच्या राजीनाम्याच्या मागणीचा मुद्दा थेट धुडकावून लावला. उल्हासनगरमध्ये सत्ताधारी पक्षाच्या आमदारानेच केलेला गोळीबार घडायला नको होता. समाजात कायदा व सुव्यवस्था राखताना सर्वांनी जबाबादारी वागणे आवश्यक आहे. विशेषतः सत्ताधारी पक्षाच्या लोकप्रतिनिधींनी अधिक जबाबदारीने वागण्याची गरज आहे, असे मत पवार यांनी व्यक्त केले.
राज्यात हिंदू जन आक्रोश मोर्चे व अन्य माध्यमातून भाजपचे आमदार नितेश राणे, तेलंगणातील याच पक्षाचे वादग्रस्त आमदार राजासिंह ठाकूर आदी मंडळींकडून दोन समाजांमध्ये द्वेष फैलावण्याचा आणि जातीयतेढ निर्माण करण्याचा प्रयत्न त्यांच्या वक्तव्यांतून होत आहे. त्यांच्यावर गुन्हेही दाखल झाले आहेत, याकडे लक्ष वेधले असता अजित पवार यांनी नितेश राणे व राजासिंह ठाकूर यांच्या प्रक्षोभक विधानांवर तीव्र नापसंती व्यक्त केली. अशा सत्ताधारी आमदारांनी तरी दोन समाजात तेढ निर्माण होणारी विधाने करण्याचे टाळावे. गुन्हे दाखल होऊनसुद्धा त्यांच्या वर्तनात फरक पडत नसत नसेल तर पोलीस प्रशासनाने कठोर कायदेशीर कारवाई करावी, अशा शब्दांत त्यांनी मत व्यक्त केले.