सोलापूर : यंदाची दहावी आणि बारावीची परीक्षा कॉपीमुक्त व्हावी यासाठी सोलापूर जिल्हा प्रशासन कठोर पावले उचलणार असून परीक्षा केंद्रावर परीक्षा सुरू असताना एक जरी कॉपीचा प्रकार आढळून आला तर त्याची जबाबदारी संबंधित परीक्षा केंद्र असलेल्या शाळेवर निश्चित करून थेट फौजदारी कारवाई करण्याचा इशारा जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी दिला आहे.
इयत्ता बारावी परीक्षेला बुधवारी प्रारंभ झाला. त्यानंतर येत्या १ मार्चपासून दहावीची परीक्षाही सुरू होणार आहे. इयत्ता बारावी परीक्षेला एकूण ११८ परीक्षा केंद्रांमधून ५५ हजार ५४१ विद्यार्थी बसले आहेत. सकाळी परीक्षेचा पहिला पेपर देण्यापूर्वी विद्यार्थी आणि पालकांची संबंधित परीक्षा केंद्रांवर परीक्षा दालन शोधण्यासाठी गर्दी झाली होती. अनेक परीक्षा केंद्रांमध्ये परीक्षार्थ्यांचे गुलाबाचे पुष्प देऊन स्वागत करण्यात आले.
हेही वाचा : नवनीत राणांचे इम्तियाज जलील यांना खुले आव्हान; म्हणाल्या, “हिंमत असेल तर…”
जिल्हास्तरावर बारावी आणि दहावी परीक्षांसाठी एकूण १८ भरारी पथके नेमण्यात आली आहेत. तालुकास्तरावर तहसीलदार व गट विकास अधिकारी यांच्या अधिनस्त स्वतंत्र भरारी पथके गठीत करण्यात आली आहेत. तसेच शिक्षणाधिकारी माध्यमिक, प्राथमिक, योजना आणि दोन उपशिक्षणाधिकारी (माध्यमिक), जिल्हा शिक्षण प्रशिक्षण केंद्राचे (डाएट) प्राचार्य, सोलापूर महापालिका प्राथमिक शिक्षण मंडळाचे प्रशासनाधिकारी यांच्या देखरेखीखालीही स्वतंत्र भरारी पथके नियुक्त करण्यात आली आहेत.
हेही वाचा : भाजपला पराभूत करण्यासाठी भाकप इंडिया आघाडी – राष्ट्रीय महासचिव डी. राजा
१ मार्चपासून सुरू होणाऱ्या दहावीच्या परीक्षेसाठी एकूण १८२ केंद्रांमधून ६५ हजार ७४९ विद्यार्थी बसणार आहेत. दोन्ही परीक्षांच्या नियोजनासंदर्भात जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी मनीषा आव्हाळे व जिल्हा ग्रामीण पोलीस अधीक्षक शिरीष सरदेशपांडे यांच्या उपस्थितीत घेतलेल्या पत्रकार परिषदेत सर्व परीक्षा केंद्रावर काॅपीमुक्त वातावरण राहण्यासाठी कठोर उपाययोजना हाती घेण्यात आल्याची माहिती दिली.