सोलापूर : चारित्र्यावर संशय घेऊन आपल्या पत्नीचा गळा दाबून आणि डोक्यावर प्रहार करून खून केल्याप्रकरणी गणेश कांतिलाल टिंगरे यास माळशिरसच्या सत्र न्यायालयाने दोषी ठरवून जन्मठेपेची शिक्षा सुनावली. माळशिरस तालुक्यातील श्रीपूर येथे राहत्या घरातच हा खुनाचा प्रकार घडला होता.
सुषमा गणेश टिंगरे ही पती गणेश आणि मुले ओम आणि मुलगी सृष्टी यांच्यासह एकत्र राहत होती. परंतु तिच्यावर पती गणेश हा चारित्र्याचा संशय घेऊन नेहमी मारहाण करीत असे. त्यांच्या शेजारी राहणारा शौकत मौला मुलाणी याने त्यांची भांडणे सोडविली होती. त्याने गणेश यास चारित्र्याचा संशय घेऊ नको म्हणून समजावून सांगितले होते. तरीही त्याने तिचा एकदा गळा दाबण्याचा प्रयत्न केला होता. त्यामुळे सुषमा माहेरी निघून गेली होती. परंतु दिवाळी सणासाठी ती पुन्हा मुलांना घेऊन पती गणेशकडे श्रीपूरमध्ये आली होती.
दरम्यान, ८ नोव्हेंबर २०१८ रोजी गणेश याच्या डोक्यात पुन्हा पत्नीच्या चारित्र्याविषयी संशय येत होता. त्यातून त्याने आपल्या दोन्ही मुलांना खाऊ आणण्यासाठी पैसे देऊन बाहेर पाठविले होते. मुले गेल्यावर गणेश याने घराचे दार लावून घेतले. त्यानंतर सुषमा ही घरात मृतावस्थेत आढळून आली होती. शेजारचा शौकत मुलानी यांना गणेश याने, आपणच सुषमा हिचा गळा आवळून आणि डोक्यावर प्रहार करून खून केल्याची कबुली दिली होती. त्यावरून शौकत मुलानी याने याबाबत अकलूज पोलीस ठाण्यात फिर्याद दिली होती.
संपूर्ण तपास पूर्ण झाल्यानंतर तत्कालीन सहायक पोलीस निरीक्षक अविनाश माने यांनी माळशिरस न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले होते. या खटल्याची सुनावणी माळशिरसचे जिल्हा व सत्र न्यायाधीश एल. डी. हुलसे यांच्यासमोर झाली. यात सरकारतर्फे दहा साक्षीदार तपासले. यात फिर्यादी शौकत मुलानी, मृताची मुले सृष्टी आणि ओम यांच्यासह वैद्यकीय अधिकारी प्रियांका सिद यांची साक्ष महत्त्वाची ठरली. आरोपी हा गुन्हा घडल्यापासून (नोव्हेंबर २०१८) न्यायालयीन कोठडीत असल्यामुळे त्यास न्यायालयीन कायद्यातील कालावधी गृहीत धरून पुढील शिक्षा भोगावयाची आहे, असे न्यायालयाने स्पष्ट केले आहे.