लोकसत्ता प्रतिनिधी

सोलापूर : स्वतःच्या घरासमोर मोकळ्या अंगणात वृद्ध नणंद-भावजय धान्य पाखडत असताना अचानक बेदरकारपणे घुसलेल्या दुचाकीस्वाराने दोघींना ठोकरले. यात गंभीर जखमी होऊन नणंदेचा मृत्यू झाला. भावजयही गंभीर जखमी झाली. अक्कलकोट तालुक्यातील चुंगी गावात दुपारी तीनच्या सुमारास हा अपघात घडला.

कान्होपात्रा संभाजी रणझुंजारे (वय ७९) असे मृत वृद्धेचे नाव आहे. तर जखमी वत्सलाबाई बाबूराव थोरे (वय ८३) यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. याबाबत जखमी वत्सलाबाई यांचा मुलगा विनोद बाबूराव थोरे यांनी, अक्कलकोट उत्तर पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीनुसार, त्यांच्याच गावातील दुचाकीस्वार आर्यन धनराज चव्हाण याच्याविरुद्ध पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

मृत कान्होपात्रा रणझुंजारे आणि त्यांच्या भावजय वत्सलाबाई थोरे या दोघी घरासमोर मोकळ्या अंगणात धान्य पाखडत बसल्या होत्या. त्यांच्या गप्पाही सुरू होत्या. त्यांच्या घरासमोर सुमारे २० फुटांच्या अंतरावरून मुख्य रस्ता जातो. परंतु या रस्त्यावरून दुचाकी चालवताना अचानकपणे नियंत्रण सुटल्याने दुचाकी वत्सलाबाई थोरे यांच्या घरासमोरील अंगणात घुसली आणि दोघींना धडक बसून हा अपघात झाला.