सोलापूर : दुचाकीला कट मारल्याच्या क्षुल्लक कारणावरून दोन गटांत सशस्त्र हाणामारी होऊन त्यात दोघा तरूणांचा खून झाला. तर अन्य चौघे जखमी झाले. सांगोला तालुक्यातील कोळा गावात काल रात्री हा प्रकार घडला. याप्रकरणी दोन्ही गटांच्या प्रत्येकी सहाप्रमाणे बारा जणांवर पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून सहा जणांना अटक केली आहे.

बाळू शामराव आलदर (वय ३०) आणि सूरज ऊर्फ बंड्या रमेश मोरे (वय २८) अशी खून झालेल्या दोघा तरूणांची नावे आहेत. यासंदर्भात कुंडलिक महादेव आलदर याने दिलेल्या फिर्यादीनुसार आदल्या दिवशी रात्री गावात दुचाकीने कट मारल्याच्या कारणावरून कुंडलिक आलदर याच्याशी सुजित चिवळा काटे व प्रीतेश गौतम काटे यांनी वाद घातला होता. दुसऱ्या दिवशी पुन्हा याच कारणावरून जाब विचारल्याने भांडण झाले. यात कुंडलिक आलदर, त्याचा चुलत भाऊ बाळू आलदर दुसरा चुलत भाऊ चंदू आलदर यांना चाकूने भोसकण्यात आले. यापैकी बाळू आलदर याचा मृत्यू झाला. यात बंड्या ऊर्फ सूरज मोरे, छोट्या ऊर्फ विनय विकास काटे, जयराम काटे, सुजित जयराम काटे, विकास मोरे व अभिमान तानाजी मोरे यांची नावे आरोपी म्हणून निष्पन्न झाली आहेत.

हेही वाचा : कृषीचा क्षेत्राचा अनुदानित युरिया उद्योगासाठी, ३८ लाखाचा साठा जप्त

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

याउलट, विकास महादेव मोरे (वय ४७) याने दिलेल्या फिर्यादीनुसार कुंडलिक आलदर, त्याचा भाऊ दत्तात्रय आलदर सागर आलदर, बाळू शामराव आलदर, बिरू ज्ञानू खरात व चंद्रकांत तूकाराम आलदर यांनी केलेल्या सशस्त्र हल्ल्यात बंड्या ऊर्फ सूरज रमेश मोरे (वय २८) याचा मृत्यू झाला. तर अन्य दोघे जखमी झाले. या घटनेनंतर सोलापूर ग्रामीणचे पोलीस अधीक्षक शिरीष सरदेशपांडे यांनी कोळा येथे घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. सांगोला पोलीस या घटनेचा पुढील तपास करत आहेत.