लोकसत्ता प्रतिनिधी
सांगली : कृषी क्षेत्राचा अनुदानित युरियाचा वापर करण्याचा प्रकार कडेगाव औद्योगिक वसाहतीमध्ये उघडकीस आला असून गोदामातून गोदामातून ३८ लाखाचा २१० टन युरिया जप्त करण्यात आला. अनुदानित युरिया संकलित करून तो औद्योगिक वापरासाठी जादा दराने विक्री करण्याचा यामागे प्रयत्न होता. या प्रकरणी कडेगाव पोलीस ठाण्यात शनिवारी फिर्याद दाखल करण्यात आली आहे.
कडेगाव औद्योगिक वसाहतीमधील सुजीत इंडस्ट्रिजच्या पश्चिमेस युरियाचा अनधिकृत साठा करण्यात आल्याची माहिती कृषी विभागाला मिळाली होती. या माहितीच्या आधारे कृषी विभागाच्या पथकाने पोलीसांना सोबत ठेवून या गोदामावर छापा टाकला.
आणखी वाचा- सांगली विमानतळाच्या जागेची विक्री ठाकरे सरकारच्या काळात – उद्योगमंत्री उदय सामंत
गोदामामध्ये ५० किलो युरियाच्या पोत्यांची थप्पी आढळून आली. या थप्पीमध्ये ४ हजार ४७९ पोती होती. यामध्ये आरसीएफ, सरदार, मद्रास फटिर्र्लायजर, इफको या कंपन्यांची युरिया आढळला तर गोदामाबाहेर उभ्या असलेल्या मालट्रकमध्ये (एमएच ०४ जीआर ३००४) ४०० पोती भरण्यात आली होती. मात्र, या पोत्यावर केवळ औद्योगिक वापरासाठी असा छापील मजकूर होता.
या गोदामातून व ट्रकमधून २१० टन वजनाचा ४ हजार ४७९ पोत्यात भरलेला युरिया जप्त करण्यात आला असून पुढील तपासासाठी काही नमुनेही ताब्यात घेण्यात आले आहेत. जप्त करण्यात आलेल्या युरियाचे मूल्य ३७ लाख ८९ हजार ७७९ रूपये आहे.
आणखी वाचा-“त्यांची भांडणं जर मिटली नाही, तर आम्ही २६ तारखेला..”, प्रकाश आंबेडकरांनी दिला अल्टिमेटम!
कृषी क्षेत्रातील वापरासाठी अनुदानित युरियाच्या 50 किलोच्या पोत्याची किंमत २६६ रूपये ५० पैसे आहे तर औद्योगिक वापराच्या युरियाचा पोत्याचा दर १ हजार ७५० रूपये आहे. कृषी सेवा केंद्रांना विक्रीसाठी मिळालेल्या कोट्यातून हा युरिया संकलित करून तो पाच पट दराने औद्योगिेक क्षेत्रासाठी विकण्याचा हा प्रकार उघडकीस आला असून गोदाम व्यवस्थापक शंकर काळे याच्याविरूध्द कडेगाव पोलीस ठाण्यात कडेगाव पंचायत समितीचे कृषी अधिकारी राहूल बिरनाळे यांनी तक्रार दाखल केली आली असून गोदाम युरिया व मालट्रकसह सील करण्यात आले आहे.