मुंबई : सांगली जिल्ह्यातील इस्लामपूर (ता. वाळवा) या शहराचे नाव बदलून ‘ईश्वरपूर’, असे करण्याचा प्रस्ताव राज्य शासनाच्या शिफारशीसह केंद्र शासनास सादर करण्यास मान्यता देण्यात आली आहे, अशी घोषणा सरकारच्या वतीने विधिमंडळाच्या उभय सभागृहांमध्ये करण्यात आली.

गाव किंवा शहर यांचे नाव बदलण्याबाबतचा विषय हा केंद्र शासनाच्या अखत्यारीत येतो. या प्रकरणी केंद्र शासनाच्या मार्गदर्शक तत्त्वांची पूर्तता होत असल्यामुळे या बाबतचा प्रस्ताव केंद्र शासनास शिफारसीसह सादर करणार आहे. केंद्र शासनाची मान्यता मिळाल्यानंतर इस्लामपूर शहराचे नामांतर ईश्वरपूर असे करण्यात येईल, असे अन्न व नागरी पुरवठामंत्री छगन भुजबळ यांनी विधानसभेत तर संसदीय कार्यमंत्री चंद्रकांत पाटील यांनी विधान परिषदेत जाहीर केले.

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे तत्कालीन इस्लामपूर प्रमुख पंत सबनीस यांनी ७० च्या दशकात शहराचे नामकरण ईश्वरपूर करावे, अशी पहिल्यांदा मागणी केली होती. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची डिसेंबर १९८६ मध्ये इस्लामपूर येथील जाहीर सभेत इस्लामपूर नव्हे तर हे ईश्वरपूर, असा उल्लेख केला होता. त्यानंतर भाजप नेते अण्णा डांगे, संभाजी भिडे यांनाही अशीच मागणी केली होती. इस्लामपूर नगरपालिकेत विकास आघाडीची सत्ता असताना तत्कालीन नगराध्यक्ष निशिकांत पाटील यांच्या अध्यक्षतेखाली १८ डिसेंबर २०२१ च्या शेवटच्या मासिक सभेत ईश्वरपूर नामांतराचा प्रस्ताव मंजूर करण्यात आला होता. गेली अनेक वर्षे हिंदुत्ववादी संघटनांकडून ही मागणी केली जात होती. तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनीही इस्लामपूर येथे झालेल्या जाहीर सभेत लवकरच इस्लामपूरचे ईश्वरपूर नामकरण करू, अशी घोषणा केली होती. यानुसार केंद्र सरकारला तशी शिफारस करण्यात येणार आहे.

दरम्यान, रायगड जिल्ह्यातील छत्र निजामपूर गावाचे नाव रायगड वाडी, असे करण्याची घोषणाही सरकारने केली. निजामपूरचे नाव बदलण्याची मागणी गेली अनेक वर्षे करण्यात येत होती.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

छत्रपती संभाजीनगर, धाराशिवनंतर ईश्वरपूर

औरंगाबादचे छत्रपती संभाजीनगर, उस्मानाबादचे धाराशिव, असे नामांतर केल्यानंतर आता इस्लामपूरचे ईश्वरपूर आणि निजामपूरचे रायगड वाडी, असे नामांतर करण्याचा निर्णय महायुती सरकारने घेतला आहे.