कडक लॉकडाउननंतरही जिल्ह्यातील करोनाचा संसर्ग वाढत असल्याने परिस्थिती गंभीर होत बनत चालल्याचे चित्र आहे. जिल्ह्यात कराड, सातारा, जावली, वाई तालुक्यात सर्वाधिक रुग्ण आढळून येत असून काही भागात करोनाचे सामूहिक संक्रमण होत आहे. जिल्ह्यात करोनाच्या रुग्णसंख्येने अडीच हजारांचा टप्पा ओलांडला आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

सातारा जिल्ह्यात बुधवारपर्यंत २२,६२० चाचणीसाठी नमुने घेण्यात आले आहेत. त्यापैकी २,६४२ इतके बाधित झाले आहेत. त्याचप्रमाणे १,४३९ रुग्णांना घरी सोडण्यात आलेले आहे. तसेच आत्तापर्यंत ९३ जणांचा मृत्यू झालेला आहे. सध्या १,११३ इतके रुग्ण उपचार घेत आहेत.

सातारा जिल्हाधिकारी शेखर सिंह यांनी जिल्ह्यात यापूर्वी एकदा आणि सध्या सुरु असलेली असं दोनदा लॉकडाउन जाहीर केला.. आत्ताच्या लॉकडाउनची कडक अंमलबजावणी करण्यात आली. मात्र, संसर्ग कमी झाल्याचे दिसत नाही, तर तो वाढतानाच दिसून येत आहे. सध्या करोनाचं सामूहिक संक्रमण (कम्युनिटी स्प्रेडिंग) सुरु आहे. यामुळे करोना साखळी तोडण्यास प्रशासनाने प्राधान्य दिले आहे. सातारा जिल्ह्यातील अनेक उद्योग, बँका, पर्यटनस्थळे सगळेच प्रतिबंधित क्षेत्रात येत असल्याने बंद आहेत. जिल्हा प्रशासन करोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करीत आहे. परंतु लॉकडाउन हा त्यावरील पर्याय म्हणता येणार नाही.

हातावर पोट असणारे, छोट्या व्यावसायिकांचे स्थिती बिकट

येत्या काळामध्ये जिल्ह्यामध्ये कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी लोकांमध्ये जनजागृती करणे गरजेचे आहे. सार्वजनिक, नोकरीच्या, कामाच्या व व्यवसायाच्या ठिकाणी व घरातही लोकांनी कशा पद्धतीने काळजी घ्यावी लागणार आहे. मुंबई-पुण्यातून जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणावर भूमिपुत्रांचे स्थलांतर झाले आहे, हे सगळे घरी बसून आहेत. सध्या ज्यांचे हातावर पोट आहे, जे व्यवसायिक आहेत, त्यांचे मात्र पुरते कंबरडे मोडले आहे. एकवेळ करोनाने मरु, मात्र भुकेने नको अशी चर्चा या लोकांमध्ये होत आहे. जिल्हा प्रशासन करोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करीत आहे. संपूर्ण शिथिलता न देता लॉकडाउनच्या ऐवजी दररोज सहा सात तास (सकाळी नऊ ते दुपारी दोन, तीन पर्यंत) उद्योग सुरु राहतील याचा विचार करावा. करोना संसर्ग पसरविणाऱ्या भाजी मंडई, बाजारपेठ, बँकांना संसर्ग दूर होईपर्यंत नियम ठरवून द्यावेत अशीही मागणी व्यापारी करीत आहेत.

सातारा जिल्ह्यातील बुधवारपर्यंतची तालुकानिहाय रुग्णसंख्या

सातारा – ४२३, जावली तालुका – ३२४,् कराड – ५४७, वाई – ३१८, खंडाळा – १९२, खटाव – १४०, कोरेगाव – १२०, महाबळेश्वर – ६९, माण – ८६, पाटण – २०५, फलटण – २१३, एकूण – २६४२.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Increase in corona infection even after strict lockdown in satara aau
First published on: 23-07-2020 at 09:36 IST