जिल्हा परिषदेच्या स्वउत्पन्नाच्या सन २०१४-१५ या आर्थिक वर्षांसाठीच्या १५ कोटी ५७ लाख रुपयांच्या मूळ व चालू वर्षांच्या ३२ कोटी ८९ लाख रुपयांच्या सुधारित अंदाजपत्रकास मुख्य कार्यकारी अधिकारी राजीव जावळेकर यांनी मंजुरी दिली. चालू वर्षांत जि. प.च्या उत्पन्नात १४ कोटींचा निधी वाढला. आचारसंहितेमुळे प्रशासकीय स्तरावर मंजूर केलेले अंदाजपत्रक आगामी सर्वसाधारण सभेत ठेवण्यात येणार आहे.
जि. प.च्या वार्षिक व सुधारित अंदाजपत्रकास गुरुवारी ‘सीईओ’ जावळेकर यांनी अंतिम मंजुरी दिली. आचारसंहितेमुळे जि. प.च्या स्वउत्पन्नाचे अंदाजपत्रक प्रशासकीय पातळीवर मंजूर करण्यात आले, असे मुख्य लेखा आणि वित्त अधिकारी यांनी सांगितले. २०१४-१५ या आर्थिक वर्षांसाठी १५ कोटी ५७ लाख रुपयांचे मूळ अंदाजपत्रक तयार करण्यात आले. मागील वर्षी महसुलातून जि. प.ला २५ कोटी उत्पन्न मिळाले. हा आकडा चालू वर्षांत ११ कोटी ५४ लाख होईल. गेल्या वर्षी मुद्रांक शुल्क अनुदानातून ६ कोटी ३० लाख मिळाले होते. मात्र, पुढील वर्षांत यातून दीड कोटीच मिळतील, असा अंदाज आहे. उपकरातून आगामी दोन वर्षांत दोन कोटींचा अंदाज आहे. सरकारने ठरवून दिलेल्या निकषानुसार समाजकल्याण विभागासाठी १कोटी ८५ लाख, त्यात अपंगांच्या पुनर्वसनास ५६ लाखांची तरतूद आहे. आरोग्य विभागासाठी ६ लाख ५१ हजार, प्रशासन विभाग ९२ लाख ७६ हजार, सामान्य प्रशासन विभाग ८७ लाख, शिक्षण विभाग १ कोटी ३२ लाख, इमारत दुरुस्ती २ कोटी ९९ लाख, पाटबंधारे विभाग ४४ लाख, औषध पुरवठा विभाग १ लाख, पशुसंवर्धनसाठी ७ लाखांची तरतूद आहे.
मागील वर्षी मूळ अंदाजपत्रक ११ कोटींचे होते. त्यात २० कोटींनी वाढ होऊन सुधारित अंदाजपत्रक ३२ कोटी ८९ लाख रुपयांचे झाले आहे. त्यामुळे चालू वर्षांत जि. प.च्या उत्पन्नात १४ कोटींची वाढ झाली. या वेळी मुख्य लेखा व वित्त अधिकारी वसंत जाधवर, सहायक लेखाधिकारी डी. बी. गंगाधरे उपस्थित होते.