सावंतवाडी: दक्षिण कोकणातील प्रसिद्ध अशा सावंतवाडी राजघराण्याच्या सुमारे २५० वर्षांच्या परंपरेनुसार, यावर्षी दीड दिवसांच्या श्री गणपतीची प्रतिष्ठापना करण्यात आली. सावंतवाडी संस्थानची ही परंपरा सध्या श्रीमंत खेम सावंत भोसले पुढे नेत आहेत. मुर्ती कारागिर राजवाडा येथेच बनवितात.
राजघराण्याच्या देवघरात पुरोहित शरद सोमण यांच्या मंत्रोच्चारात गणरायाची प्राणप्रतिष्ठापना करण्यात आली. यावेळी राजघराण्याचे सदस्य आणि अनेक गणेशभक्त उपस्थित होते.
ऐतिहासिक वारसा आणि लाल रंगाचा गणपती :
ही परंपरा तिसरे खेम सावंत भोसले यांनी २५० वर्षापुर्वी सुरू केली होती. त्याकाळी ४ ते ५ फूट उंचीची शाडू मातीची मूर्ती असायची आणि लोक एकत्र येऊन हा उत्सव साजरा करत असत. आजही राजघराण्याशी संबंधित अनेक घरांमध्ये लाल रंगाच्या गणपतीची प्रतिष्ठापना करण्याची प्रथा आहे. या लाल रंगाच्या गणपतीमागे गणपती नावाशी संबंधित काही पौराणिक कथा असल्याचे सांगितले जाते. विशेष म्हणजे, माठेवाडा येथे राजश्री तिसरे खेमसावंत यांच्या माठ्यात आजही लाल रंगाचा गणपती पूजला जातो.
राजघराण्याने जनतेच्या सुखासाठी मागितले साकडे:
गणेशाच्या प्राणप्रतिष्ठापनेनंतर, पूजन, आरती आणि भजनाचे कार्यक्रम झाले. राजघराण्याने गणरायाला मोदकांसह नैवेद्य अर्पण केला. यावेळी सावंत-भोसले कुटुंबियांनी गणरायाची आराधना करत जनतेला सुखी, समाधानी आणि आनंदी ठेवण्यासाठी साकडे घातले. युवराज लखमराजे भोसले यांनी सर्वांना गणेश चतुर्थीच्या शुभेच्छा दिल्या. त्याचबरोबर, गणराया व श्री देव पाटेकराच्या कृपेने हा उत्सव निर्विघ्नपणे पार पडावा आणि जनतेच्या इच्छा पूर्ण व्हाव्यात, असे मागणंही त्यांनी केले.
या प्रसंगी श्रीमंत खेमसावंत भोसले, सौ. शुभदादेवी भोसले यांनी पूजा केली. यावेळी युवराज लखमराजे भोंसले, युवराज्ञी श्रद्धाराजे भोंसले, राजकन्या उर्वशीराजे भोंसले, राजघराण्याचे जावई संदीप बोथीरेड्डी यांच्यासह अनेक गणेशभक्त उपस्थित होते.