India Budget 2024 : केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी आज संसदेत देशाचा अंतरिम अर्थसंकल्प सादर केला. आपल्या भाषणात त्यांनी म्हटले, “२०१४ साली आम्ही (एनडीए) सत्तेत आल्यावर टप्प्याटप्प्याने अर्थव्यवस्था सुधारण्यासाठी प्रयत्न केले. तसेच शासन व्यवस्थेतही सुधारणा केली. २०१४ पूर्वी भारताची अर्थव्यवस्था ज्या संकटांचा सामना करत होती, त्यावर मात करून आपण सर्वांगीण प्रगती केली आहे. तसेच आपली अर्थव्यवस्था शाश्वत विकासाच्या मार्गावर आणली आहे. आपली प्रगती तपासण्यासाठी २०१४ पूर्वी आपण कुठे होतो आणि आत्ता आपण कुठे आहोत याकडे पाहण्याची आवश्यकता आहे. यावेळी अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी वेगवेगळ्या घोषणा केल्या.
दरम्यान, या अर्थसंकल्पावर राजकीय प्रतिक्रिया येऊ लागल्या आहेत. वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकर यांनीदेखील यावर त्यांचं मत मांडलं आहे. आंबेडकर यांनी एक्स या मायक्रोब्लॉगिंग प्लॅटफॉर्मवर एक पोस्ट केली आहे. यामध्ये त्यांनी म्हटलं आहे की, हे सरकार केवळ ज्ञान पाजळतंय, परंतु, त्यांची या देशातल्या तरुणांशी, गरिबांशी, महिला आणि शेतकऱ्यांशी बांधिलकी दिसत नाही. अर्थमंत्री केवळ स्वतःची बढाई मारण्यात, थापा मारण्यात, भाषणबाजी करण्यात आणि खोटं बोलण्यात गुंतल्या आहेत. अर्थमंत्र्यांनी म्हटल्याप्रमाणे आपली अर्थव्यवस्थ उत्तम असेल तर गेल्या नऊ वर्षांमध्ये तब्बल १२,८८,२९३ उद्योजकांनी भारत का सोडला? ७,२५,००० भारतीयांनी बेकायदेशीरपणे अमेरिकेत प्रवेश करण्याचा प्रयत्न का केला? यापैकी बहुसंख लोक हे ‘व्हायब्रंट गुजरात’शी संबंधित होते.
प्रकाश आंबेडकर म्हणाले, केंद्राने दावा केला आहे की, लोकांचं सरासरी उत्पन्न ५० टक्क्यांनी वाढलं आहे. परंतु, या डेटाचा स्त्रोत काय आहे? सरकारी योजनांच्या लाभार्थ्यांची संख्या आणि पीएम-किसान योजनेबाबतचा डेटा संशयास्पद आहे. केंद्राने अंतरिम अर्थसंकल्पात केवळ ज्ञान पाजळण्याचं काम केलं आहे.
हे ही वाचा >> केंद्र सरकार लक्षद्वीपसह भारतीय बेटांचा चेहरा-मोहरा बदलणार? पायाभूत सुविधांसाठी अर्थमंत्र्यांकडून मोठ्या गुंतवणुकीची घोषणा
उद्धव ठाकरेंची सरकारवर टीका
अर्थसंकल्प जाहीर झाल्यानंतर शिवसेनेच्या ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनीदेखील यावर प्रतिक्रिया दिली आहे. उद्धव ठाकरे म्हणाले, “मोदी सरकारने आज शेवटचा अर्थसंकल्प सादर केला. निर्मला सीतारमण यांनी जड अंतःकरणाने हे कार्य पार पाडलं. त्यासाठी मी त्यांचं अभिनंदन करतो आहे. मी संपूर्ण अर्थसंकल्प पाहिला नाही. पण काही ठळक घडामोडींची माहिती घेतली. अर्थमंत्री म्हणाल्या, देशात आम्ही गरीब, महिला, तरुण आणि शेतकरी या चार जातींसाठी काम करणार आहोत. या वक्तव्याबद्दल मी अर्थमंत्र्यांचं अभिनंदन करतो. कारण त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींसमोर हे बोलण्याचं धाडस केलं. संसदेत पंतप्रधान नरेंद्र मोदींसमोर हे त्या बोलल्या. निवडणुका आलेल्या आहेत, तरीही त्यांनी पंतप्रधानांना सांगितलं की देशात फक्त तुमचे सुटाबुटातले मित्र नाहीत. तुमच्या मित्रांच्या पलिकडेसुद्धा देश आहे. ज्यात तरुण, महिला, शेतकरी आणि गरीब जनता आहे. सरकारच्या दहाव्या वर्षी या चार जाती तुम्हाला कळल्या. तुमच्याबरोबरचे अदाणी म्हणजे देश नाही. सुटाबुटातलं सरकार आता गरीबांकडे लक्ष द्यायला आलं आहे.”