Finance Minister Nirmala Sitharaman Speech, India Budget 2024 : केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी आज (१ फेब्रुवारी) अवघ्या ५८ मिनिटांमध्ये देशाचा अंतरिम अर्थसंकल्प सादर केला. यावेळी सीतारमण म्हणाल्या, आपली अर्थव्यवस्था गतिमान करण्याच्या दृष्टीने आपण पुढे चाललो आहोत. त्याचबरोबर कर रचनेत (Tax slab) कोणताही बदल करण्यात आलेला नाही. त्याचबरोबर केंद्र सरकारने प्राप्तिकर भरणाऱ्यांना कोणताही दिलासा दिलेला नाही. ७ लाखांपर्यंतच्या उत्पन्नावर कर आकारला जात नसून प्राप्तिकर भरण्याची प्रक्रिया सुलभ करण्यात आली आहे, असं सीतारमण यांनी सांगितलं. अर्थमंत्र्यांनी यावेळी दावा केला की, २०४७ पर्यंत भारत एक विकसित राष्ट्र असेल.
केंद्र सरकार देशातील पर्यटन क्षेत्रात लक्षणीय गुंतवणूक करेल, अशी घोषणा करत अर्थमंत्री निर्मला सीतारमण म्हणाल्या, देशांतर्गत पर्यटनाला चालना देण्यासाठी लक्षद्वीपसह भारतातील इतर बेटांवर सहज ये-जा करता यावी यासाठी उत्तम कनेक्टिव्हिटी, पर्यटन पायाभूत सुविधा आणि इतर गरजेच्या सुविधा पुरवण्यासाठीचे प्रकल्प सुरू केले जातील.
हे ही वाचा >> Budget 2024 Live: अंतरिम अर्थसंकल्पावर पंतप्रधान मोदी म्हणाले, “आज दोन महत्त्वाच्या घोषणा झाल्या, त्यात…!”
केंद्रशासित प्रदेश असलेल्या लक्षद्वीप बेटांवर पर्यटन पायाभूत सुविधा सुधारण्यासाठी केंद्र सरकार गुंतवणूक करणार आहे. मालदीवबरोबरच्या वादानंतर आता अनेक भारतीय नागरिक पर्यटनासाठी मालदीवऐवजी लक्षद्वीपकडे एक चांगला पर्याय म्हणून पाहत आहेत. अशातच केंद्र सरकारने लक्षद्वीपचा विकास करण्यावर लक्ष केंद्रीत केलं आहे. यामुळे लक्षद्वीप, अंदमान निकोबारसह इतर बेटांचा विकास होईल, तसेच तिथे जाणाऱ्या पर्यटकांची संख्या वाढेल.
हे ही वाचा >> Budget 2024 : ”कर रचनेत कोणताही बदल नाही”, निर्मला सीतारमण म्हणाल्या…”जीएसटी संकलन…”
२०४७ पर्यंत भारत विकसित राष्ट्र असेल
अर्थमंत्री निर्मला सीतारमण म्हणाल्या, “आर्थिक सुधारणांवर भर देत आपला देश पुढे जातो आहे. २०४७ पर्यंत भारत देश हे विकसित राष्ट्र असेल यात काही शंकाच नाही. पंतप्रधान नरेंद्र मोदी हे देशासाठी काम करत असताना गरीब, महिला, अन्नदाता शेतकरी त्यांची प्रगती साधणं ही प्राथमिकता आहे. मागच्या दहा वर्षांमध्ये २५ कोटी लोक हे दारिद्र्यरेषेच्या बाहेर आले आहेत. गरीब कल्याण हे देशाचं कल्याण हा मंत्र घेऊन पंतप्रधान मोदी वाटचाल करत आहेत. त्याचाच हा परिणाम आहे.”