बुलडाण्यातील लोणार सरोवर, औरंगाबाद जिल्ह्य़ातील जायकवाडी आणि नाशिक जिल्ह्य़ातील नांदूर-मधमेश्वर या तीन जलाशयांचा समावेश पक्ष्यांसाठीच्या आंतरराष्ट्रीय ‘रामसर पाणवठय़ां’मध्ये करण्यासाठी प्रयत्न केले जाणार आहेत.
तसे झाले तर असा दर्जा मिळविणारे हे राज्यातील पहिलेच पाणवठे ठरतील. त्याद्वारे या पाणवठय़ांचे संवर्धन करून तिथे पर्यटनाला चालना देणे शक्य होईल.
पक्ष्यांसाठी महत्त्वाच्या ठरणाऱ्या जगभरातील पाणथळींच्या नोंदी ‘रामसर पाणवठे’ म्हणून केल्या जातात. त्यात देशातील भरतपूरसारखे पाणवठे आहेत. त्यात राज्यातील एकाही जलाशयाचा समावेश नाही. त्यात या तीन जलाशयांचा समावेश करावा, अशी शिफारस राज्य वन्यजीव मंडळाच्या बैठकीत गुरुवारी करण्यात आली.
हा प्रस्ताव केंद्राच्या वन्यजीव बैठकीत चर्चिला जाईल. त्यात मान्यता मिळाल्यास त्याची आंतरराष्ट्रीय मंडळापुढे शिफारस केली जाईल. त्यात ही ठिकाणे मंजूर झाल्यास त्यांचा समावेश आंतरराष्ट्रीय रामसर पाणवठय़ांमध्ये केला जाईल. त्याचा फायदा पर्यटन वाढविण्यासाठी व या जलाशयांच्या संवर्धनासाठी केला जाईल, असे मुख्यमंत्र्यांनी सांगितले.

नवी मुंबई विमानतळासाठीचा अडथळा दूर?
नव्याने येऊ घातलेल्या नवी मुंबई विमानतळाला पनवेलजवळील कर्नाळा पक्षी अभयारण्यामुळे काही प्रमाणात अडथळा निर्माण होत होता. वन्यजीव अधिनियमानुसार, अभयारण्यापासून दहा किलोमीटर अंतरावर विमानतळ असू शकत नाही. मुंबई विमानतळाचे एक टोक कर्नाळ्यापासून साडेनऊ किलोमीटर अंतरावर आहे. या स्थितीत काही सकारात्मक बदल करून या विमानतळाचा अडथळा दूर करण्याचा प्रयत्न केला जात आहे. त्यामुळे हे विमानतळ मार्गी लागेल, असे मुख्यमंत्री म्हणाले.

उजनी व शिवडीचा प्रस्ताव
या तीन पाणवठय़ांचा निर्णय झाल्यानंतर भविष्यात पुणे व सोलापूर जिल्ह्य़ांच्या सीमेवरील उजनी धरण आणि मुंबईजवळील शिवडी या पाणथळींचाही प्रस्ताव राज्यातर्फे पाठविण्यात येणार आहे. या सर्वच ठिकाणी विविध प्रकारचे स्थलांतरित पक्षी पाहायला मिळतात.