Raigad Khalapur Irshalgad Irshalwadi Landslide: रायगड जिल्ह्यातल्या इर्शाळगडावरील इर्शाळवाडीवर बुधवारी रात्रीच्या सुमारास दरड कोसळली. मध्यरात्रीनंतर तिथे बचावकार्य सुरू झालं. गुरुवारी दिवसभर बचावकार्य केल्यानंतरही अद्याप घटनास्थळी मोठ्या प्रमाणावर मातीचा ढिगारा असून अजूनही तिथे ५० ते ६० जण ढिगाऱ्याखाली अडकले असण्याची शक्यता वर्तवली जात आहे. त्याामुळे आज दुसऱ्या दिवशीही एनडीआरएफनं सकाळीच बचावकार्याला सुरुवात केली आहे. आज दिवसभर बचावकार्य चालण्याची शक्यता स्थानिक पदाधिकाऱ्यांकडून वर्तवली जात आहे.

कुठे आहे इर्शाळवाडी?

रायगड जिल्ह्यातल्या इर्शाळगडाच्या पायथ्यापासून काही उंचीवर इर्शाळवाडी आहे. साधारणपणे ४८ कुटुंबांची ही वाडी असून त्यातील २५ ते ३० घरांवर दरड कोसळल्याची माहिती उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी गुरुवारी विधानसभेतील निवेदनात दिली. पायथ्यापासून काही उंचीवर ही वाडी वसली आहे. मात्र, या वाडीपर्यंत जाण्यासाठी पक्का रस्ता उपलब्ध नाही. त्यामुळे एनडीआरएफ आणि प्रशासनाला जेसीबी किंवा पोकलेन घटनास्थळापर्यंत नेणं अशक्य झालं आहे. दोन तासांची पायपीट करूनच पायथ्यापासून घटनास्थळापर्यंत पोहोचणं शक्य होत आहे.

२० पुटांचा मातीचा ढिगारा

दरम्यान, एनडीआरएफच्या काही जवानांनी टीव्ही ९ला दिलेल्या माहितीनुसार, अद्याप घटनास्थळी २० फुटांचा दगड-मातीचा ढिगारा तिथे असून तो उपसण्याचं काम निव्वळ कुदळ-फावड्याच्या साहाय्याने केलं जात आहे. “वर चढून जाणं कठीण आहेच. जेसीबी, पोकलेन वर नेणं अशक्य आहे. सातत्याने पाऊस पडतोय. आम्ही काम करतोय तिथे पुन्हा पाणी साचतंय. त्यामुळे कामाचा एकेक मिनीट आमच्यासाठी महत्त्वाचा आहे. हे बचावकार्य अजून किती वेळ चालेल हे सांगता येत नाही. कारण कुदळ-फावड्यानं ढिगारा उपसला जात आहे. एनडीआरएफची चार पथकं बचावकार्य करत आहेत. तिथे २० फुटांचा ढिगारा आला आहे. तो तिथून हटवणं फार कठीण आहे”, अशी माहिती एनडीआरएफकडून दिली जात आहे.

…अन् काही क्षणांत समोर मातीचा ढीग झाला; ईर्शाळवाडीवर दरड कोसळली, गावाची ह्रदय पिळवटून टाकणारी दृश्यं!

सकाळी पावसाची उघडीप

इतर सर्व अडचणींमध्ये बचाव पथकांसाठी पावसानं सकाळच्या सुमारास काही काळ घेतलेली उघडीप दिलासादायक ठरली. मात्र, या भागात आजही मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता वर्तवण्यात आल्यामुळे बचावकार्यामध्ये आजही दिवसभर अडथळ्यांचा सामना बचाव पथकांना करावा लागण्याची शक्यता आहे.