मागील काही दिवसांपासून राज्यात मराठा आरक्षणावरून राजकीय वातावरण तापलं आहे. ठरलेल्या वेळेत सरकारने आरक्षण न दिल्याने मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी आक्रमक भूमिका घेतली असून पुन्हा एकदा उपोषणाला सुरुवात केली आहे. दरम्यान, वकील गुणरत्न सदावर्ते यांनी मराठा आरक्षणाला विरोध केला आहे. मराठा समाजाला आरक्षण मिळूच देणार नाही, अशी भूमिका सदावर्ते यांनी घेतली आहे. यानंतर गुरुवारी सकाळी काही मराठा आंदोलकांनी गुणरत्न सदावर्ते यांच्या कारची तोडफोड केली आहे.

या सर्व घडामोडींनंतर गुणरत्न सदावर्ते हा भाजपाचा माणूस असून ते उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे निकटवर्तीय असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात आहे. यावर आता केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. गुणरत्न सदावर्ते हे कोण आहेत? हे सर्वांना माहीत आहेत. त्यांचा भाजपाशी कसलाही संबंध नाही, अशी प्रतिक्रिया दानवे यांनी दिली. ते ‘टीव्ही ९ मराठी’शी बोलत होते.

हेही वाचा- अजित पवारांसमोरच पंतप्रधान मोदींची शरद पवारांवर टीका; म्हणाले, “मी त्यांचा सन्मान…”

गुणरत्न सदावर्तेंचा एकेरी उल्लेख करत रावसाहेब दानवे म्हणाले, “हे पाहा, गुणरत्न सदावर्ते कोण आहे? हे सर्वांना माहीत आहे. देवेंद्र फडणवीस यांनी मराठा समाजाला दिलेलं आरक्षण उच्च न्यायालयात टिकवलं होतं. त्याला आव्हान देणारा हा माणूस आहे. त्यानेच मराठा आरक्षणाला आव्हान दिलं होतं, त्यानंतर हे आरक्षण रद्द झालं. हे रद्द झालेलं आरक्षण आम्हाला पुन्हा मराठा समाजाला द्यायचं आहे. इतर कोणत्याही समाजावर अन्याय करून मराठा समाजाला आरक्षण द्यायची आमची भूमिका नाही. प्रत्येकाला दिलेलं आरक्षण जसंच्या तसं ठेवून मराठा समाजाला एक वेगळं आरक्षण देण्यासाठी कोर्टात याचिका दाखल केली आहे. हा शेवटचा प्रयत्न यशस्वी झाला आणि कोर्टाने मान्य केलं तर मराठा समाजाला नक्कीच आरक्षण मिळाल्याशिवाय राहणार नाही.”

हेही वाचा- VIDEO: गुणरत्न सदावर्तेंची गाडी का फोडली? मराठा आंदोलक मंगेश साबळेची पहिली प्रतिक्रिया, थेट कारण सांगितलं

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

“गुणरत्न सदावर्ते याचा भाजपाशी किंवा देवेंद्र फडणवीसांशी काहीही संबंध नाही. याउलट हा भाजपाच्या विरोधातील माणूस आहे. त्यांचे आताच वाकडे तिकडे वक्तव्यं समोर येत आहेत. त्यांची अगोदरची विधानं तपासून बघितली पाहिजे,” असंही रावसाहेब दानवे यावेळी म्हणाले.