सांगली : इस्लामपूर आगाराला मिळालेल्या पाच नवीन बसवरून श्रेयवाद रंगला असून बसचे दोन वेळा लोकार्पण करण्यात आले. आ. जयंत पाटील यांनी परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांना पत्र लिहिल्याने नवीन पाच बस मिळाल्याचा दावा केला असून याला प्रत्युत्तर देताना आ. सदाभाऊ खोत यांनी ३५ वर्षे मंत्री होता तेव्हा पत्र लिहिण्यास सुचले नाही का, असा सवाल उपस्थित केला आहे.
दोन दिवसांपूर्वी आ. जयंत पाटील यांच्या हस्ते इस्लामपूर आगारात दाखल झालेल्या पाच नवीन बसचे पूजन करण्यात आले. यावेळी सांगलीचे विभाग नियंत्रक सुनील भोकरे, इस्लामपूरचे आगार व्यवस्थापक दिलीप ठोंबरे, मिलिंद कुंभार, दीपक यादव आदींसह राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे पदाधिकारी उपस्थित होते. यावेळी आ. पाटील यांनी १४ फेब्रुवारीला परिवहन मंत्र्यांना पत्र लिहिल्याने बस मिळाल्याचे सांगत नव्या बसमधून कार्यकर्त्यांसह प्रवासही केला. दरम्यान, इस्लामपूर आगारात नव्याने दाखल झालेल्या बसचे पूजन आ. पाटील यांनी केल्याचे समजताच आ. खोत यांनी माजी नगराध्यक्ष निशिकांत भोसले-पाटील, गौरव नायकवडी यांना घेऊन पुन्हा एकदा बसचे पूजन करून लोकार्पण सोहळा गुरुवारी केला. यावेळी आ. पाटील यांचे विरोधक असलेले राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार), शिवसेना (शिंदे) गटाचे पदाधिकारी, भाजपचे कार्यकर्ते उपस्थित होते.
यावेळी बोलताना आ. खोत म्हणाले, बस पूजन करण्याची काही लोकांना खूप गडबड झाली, त्यांना वाटते पत्र दिल्याने बसेस आल्या. त्यांचे महाविकास आघाडी सरकार होते तेव्हा बसेस का आल्या नाहीत, ३५ वर्षे मंत्री होता तेव्हा पत्र द्यायला सुचले नाही. महायुती सरकारने राज्यातील सर्वच आगारांना नवीन बस दिल्या आहेत. त्यामुळे याचे श्रेय फक्त महायुती सरकारचे आहे. पहिल्या टप्प्यात ५ बस आल्या असून आणखी पाच बस येणार आहेत. बी. ओ. टी. तत्त्वावर या बस स्थानकांच्या नूतनीकरणाचा प्रस्ताव देखील लवकरच सादर केला जाणार आहे. यावेळी आ. सत्यजित देशमुख म्हणाले, शिराळा व इस्लामपूर बसस्थानकाकडे नवीन बसची मागणी लक्षात घेता पहिल्या टप्प्यात पाच बस आल्या आहेत. या दोन्ही बस स्थानकासाठी नवीन जास्तीत जास्त बस मिळाव्यात यासाठी आमचा प्रयत्न राहील. यावेळी भोसले-पाटील यांनी प्रवासी मार्ग आणि प्रवासी संख्या पाहता इस्लामपूर आगारासाठी आणखी नवीन बस मिळाव्यात यासाठी आमचे प्रयत्न राहतील असे सांगितले.