Jay Pawar : आगामी महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय घडामोडींना वेग आला आहे. सर्वच राजकीय पक्षांच्या नेत्यांनी निवडणुकीच्या अनुषंगाने जोरदार मोर्चे बांधणी सुरू केली आहे. राज्यातील विविध भागात नेत्यांचे दौरे सुरू असून कार्यकर्त्यांकडून पक्ष संघटनेचा आढावा घेत कार्यकर्त्यांना नेते मंडळी मार्गदर्शन करत असल्याचं चित्र पाहायला मिळत आहे. या सर्व घडामोडी सुरू असताना एक महत्वाची बातमी समोर आली आहे.

राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे चिरंजीव जय पवार हे राजकीय मैदानात उतरणार असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे. बारामती नगरपरिषदेच्या नगराध्यक्ष पदासाठी राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) पक्षाकडून निवडणुकीच्या मैदानात उतरण्याची शक्यता आहे. या चर्चांचं कारण म्हणजे बारामती नगरपरिषदेचं नगराध्यक्षपद सर्वसाधारण प्रवर्गासाठी राखीव असल्याने जय पवार यांच्या नावाची चर्चा रंगली आहे.

बारामती नगरपरिषदेच्या नगराध्यक्षपदाच्या निवडणुकीसाठी जय पवार यांच्या नावाची चर्चा रंगल्याच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) पक्षाच्या खासदार सुप्रिया सुळे यांना माध्यमांच्या प्रतिनिधींनी प्रश्न विचारला. मात्र, या प्रश्नावर सुप्रिया सुळे यांनी अगदी मोजक्या शब्दांत उत्तर दिलं आहे. हा त्यांच्या पक्षातील अंतर्गत प्रश्न असल्याचं सुळेंनी म्हटलं आहे.

खासदार सुप्रिया सुळे काय म्हणाल्या?

“उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने कोणाला उमेदवारी द्यायची? हा त्यांच्या पक्षातील अंतर्गत प्रश्न आहे. आपण एका सशक्त लोकशाहीमध्ये राहतो आणि कोणत्याही पक्षाने कोणाला उमेदवारी द्यायची हा त्यांचा अंतर्गत प्रश्न आहे”, अशा मोजक्या शब्दांत खासदार सुप्रिया सुळे यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

दरम्यान, उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे चिरंजीव जय पवार हे राजकारणात उतरणार असल्याची चर्चा सध्या रंगली असली तरी यावर अद्याप अजित पवार, जय पवार यांच्यापैकी किंवा राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) पक्षाच्या वतीनेही अद्याप कोणाची प्रतिक्रिया समोर आलेली नाही. त्यामुळे यावर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून काय प्रतिक्रिया येते? हे महत्वाचं असणार आहे. तसेच अजित पवार याबाबत काय भूमिका घेतात? याकडेही बारामतीकरांचं लक्ष लागलेलं आहे.