ऊसदर आंदोलनाचे लोण सोमवारी कोल्हापूर जिल्ह्याच्या पश्चिम भागाकडे सरकले. तात्यासाहेब कोरे वारणा साखर कारखान्याने पहिली उचल जाहीर न करता कारखाना सुरू केल्याने जय शिवराय किसान संघटनेने ऊस वाहतूक रोखली.
साखर आयुक्त यांनी कारखानदारांना एफ्आरपी प्रमाणे पहिली उचल जाहीर केल्याशिवाय कारखाने सुरू करता येणार नाहीत, असे कळवले असताना वारणा कारखाना प्रशासनाने उचल जाहीर न करता कारखाना सुरू केला आहे. शिवाय मागील गळीत हंगामातील आरएसएफ हिशोब कारखान्याने अद्यापही सादर केलेला नाही.
हेही वाचा- १ लाख ५९ हजार कोटी जास्त की २ हजार कोटी जास्त?, आदित्य ठाकरेंचा फडणवीसांना खोचक टोला
त्यामुळे वठार – तळसंदे रस्त्यावर उसाची भरलेली वाहने सोमवारी संघटनेचे पदाधिकारी बंडा पाटील, गब्बर पाटील, शितल कांबळे, सागर माळी, सचिन पाटील, रामदास वड्ड आदींसह शेतकरी, कार्यकर्ते यांनी अडवली. कारखान्याचे कार्यकारी संचालक एम. डी. भगत यांच्याशी चर्चा झाली. त्यांनी दोन दिवसांमध्ये एकरकमी एफआरपी देण्याची घोषणा करीत असल्याचे शिष्टमंडळात सांगितले. घोषणेप्रमाणे कार्यवाही केली नाही तर तीव्र आंदोलन करण्याचा इशारा जय शिवरायचे अध्यक्ष शिवाजी माने यांनी दिला.