जालना : जिल्ह्य़ातील घनसावंगी तालुक्यातील दैठणा येथील ज्ञानेश्वर उर्फ माऊली नामदेव धांडे याच्याविरुद्ध जिल्हाधिकाऱ्यांनी ‘एमपीडीए’ अर्थात महाराष्ट्र धोकादायक कारवाया प्रतिबंधक कायद्यान्वये कारवाई केली आहे.
अंबड पोलिसांनी जिल्हा पोलिस अधीक्षक कार्यालयाच्या मार्फत जिल्हाधिकाऱ्यांकडे यासंदर्भातील प्रस्ताव पाठविला होता. दूधना नदीपात्रात अवैध वाळू उपसा करून चोरटी वाहतूक करणे, अवैध वाळू उपसा आणि वाहतुकीस प्रतिबंध करण्यासाठी गेलेल्या शासकीय अधिकारी आणि कर्मचाऱ्यांवर हल्ले करणे इत्यादी संदर्भात धांडे याच्यावर गुन्हे दाखल झालेले आहेत. यापूर्वी स्थानिक गुन्हे शाखेने त्याच्यावर प्रतिबंधक कारवाई केली होती, परंतु त्यात फरक पडला नव्हता. त्यामुळे अंबड पोलिसांनी त्याच्याविरुद्ध ‘एमपीडीए’अंतर्गत कारवाईचा प्रस्ताव वरिष्ठांकडे पाठविला होता.
जिल्हाधिकारी डॉ. श्रीकृष्ण पांचाळ यांनी गेल्या १९ मे रोजी पोलिसांचा प्रस्ताव मंजूर करून धांडे यास एक वर्षासाठी स्थानबध्द करून त्याची कारागृहात रवानगी करण्याचा आदेश काढला. तेव्हापासून पोलिस त्याच्या शोधात होते परंतु तो सापडत नव्हता. परंतु तांत्रिक माहितीच्या आधारे पोलिसांना त्याचा सुगावा लागला. त्यानंतर चार जून पोलिसांनी सापळा रचून दैठणा गावाच्या शिवारातून त्यास ताब्यात घेतले.