जालना : जालना महानगरपालिकेचे पहिले आयुक्त म्हणून कारभार पाहात असलेले संतोष खांडेकर हे १० लाख रुपयांची लाच घेताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या सापळ्यात अडकले. मनपा आयुक्तांच्या शासकीय निवासस्थानी गुरुवारी सायंकाळी ही कारवाई करण्यात आल्याची माहिती आहे.

या प्रकरणी छत्रपती संभाजीनगर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या अधीक्षक माधुरी केदार कांगणे यांना विचारले असता त्यांनी सदरची कार्यवाही सुरू असल्याची माहिती दिली. तक्रारदार बांधकाम कंत्राटदाराकडून केलेल्या कामाचे देयक काढण्यासाठी मनपा आयुक्त संतोष खांडेकर यांनी मोठी रक्कम लाच म्हणून मागितली.

त्यातील १० लाख रुपयांवर तडजोड झाली. त्या संदर्भातील तक्रार नोंद झाल्यानंतर खांडेकर १० लाख घेताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने लावलेल्या सापळ्यात अडकले.

जालना नगरपरिषदेचे रूपांतर

महानगरपालिकेत झाले, त्यावेळी संतोष खांडेकर हेच मुख्याधिकारी पदावर कार्यरत होते. ऑगस्ट २०२३ मध्ये संतोष खांडेकर यांची पालिका रूपांतरीत महानगरपालिकेच्या प्रभारी आयुक्तपदी नियुक्ती करण्यात आली होती. २०२४ मध्ये खांडेकर यांच्याकडे रितसर प्रशासक आणि आयुक्तपदाची सूत्रे देण्यात आली. खांडेकर यापूर्वीही जालना नगरपरिषदेच्या मुख्याधिकारी पदाह पदावर होते. जालना महापालिकेचे पहिले आयुक्त आणि प्रशासक म्हणून काम करण्याची संधी खांडेकर यांना मिळाली आहे. त्यांच्यावरील कारवाईने जालना जिल्ह्यात खळबळ उडाली आहे. खांडेकर यांच्या शासकीय निवासस्थानाबाहेर एक पथक उभे असून, त्याची चर्चा सुरू आहे.