जालना – काँग्रेसचे माजी आमदार कैलास गोरंट्यालच नव्हे तर राष्ट्रवादीचे (शरद पवार) अनेक जण भाजप प्रवेशासाठी उत्सुक आहेत असे भाजपचे जिल्हा अध्यक्ष आमदार नारायण कुचे यांनी सांगितले. गोरंट्याल यांनी शुक्रवारी आमदार कुचे यांची भेट घेतली. अर्धा-पाऊण तास झालेल्या या भेटीनंतर माध्यम प्रतिनिधींशी बोलताना कुचे म्हणाले, भाजपमध्ये यावे किंवा नाही याचा निर्णय स्वतः त्यांना घ्यावयाचा आहे.परंतु गोरंट्यालच नव्हे तर जिल्हयातील राष्ट्रवादी (शरद पवार) काँग्रेस पक्षातीलही अनेक जण भाजपमध्ये येण्यासाठी इच्छुक असून रांगेत उभे आहेत. हे पक्षप्रवेश झाले तर जिल्ह्यातील स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकांच्या अगोदरच होतील.
गोरंट्याल यांनी या अगोदर रावसाहेब दानवे आणि अशोक चव्हाण या भाजप नेत्यांचीही भेट घेतली असल्याचे सांगून कुचे म्हणाले, त्यांच्या पक्ष प्रवेशाच्या संदर्भात आपण सकारात्मक आहोत. त्यांना जर भाजपमध्ये यावयाचे असेल तर कुणाच्याही मध्यस्थीची आवश्यकता नाही. ते मुख्यमंत्री फडणवीस किंवा भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्याशी सरळ चर्चा करू शकतात.
जनतेचा काँग्रेसवर विश्वास राहिलेला नाही. गोरंटयाल आणि अनेक जण काँग्रेस पक्षात हतबल झालेले आहेत. त्यांनी प्रवेशाचा निर्णय घेतला तर भाजपची ताकद वाढेल. ते आणि आपण एकाच वेळी विधानसभा सदस्य होतो. एके काळी आमच्यावर टीका करणारे विरोधी पक्षातील अनेक जण आता भाजपमध्ये प्रवेशासाठी उत्सुक आहेत.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा लवकरच जालना जिल्हा दौरा होणार असून त्यावेळी गोरंट्याल यांच्या भाजप प्रवेशाची चर्चा जिल्हयातील राजकीय वर्तुळात आहे. या अनुषंगाने विचारलेल्या प्रश्नावर कुचे म्हणाले, जिल्हयातील कांही विकास कामांची भूमीपूजने फडणवीस यांच्या हस्ते करावयाची होती. परंतु विधिमंडळ अधिवेशन आणि पावसाळ्याच्या दिवसांमुळे ते यापूर्वी शक्य होऊ शकले नाही. गोरंट्याल यांनी भाजप प्रवेशाचा निर्णय घेतला तर ते कदाचित येऊही शकतील. परंतु त्यासाठी पक्षाचे मुंबई येथील प्रदेश कार्यालय आहे ना? त्यांना पक्षात यावयाचे असेल तर हा प्रवेश यापैकी कुठेही होऊ शकतो.