जालना : गेल्या वर्षीच्या (२०२४) पावसाळ्यातील जून ते सप्टेंबर या चार महिन्यांत जालना जिल्हयात जेवढा पाऊस झाला होता, त्या तुलनेत यावर्षी (२०२५) ३३ टक्केच पाऊस मे आणि जूनच्या पहिल्या पंधरवडयात झाला आहे. गेल्या पावसाळ्यातील चार महिन्यांत जिल्हयात सरासरी ८१३ मि.मी. पाऊस झाला होता. चालू वर्षी मे महिन्यात जिल्हयात सरासरी २०५ मि. मी. मान्सूनपूर्व पाऊस झाला. तर १ जून ते १५ जून दरम्यान सरासरी ६१ मि.मी. पावसाची नोंद झाली. यावर्षी मे महिन्याच्या पहिल्या आठवड्यात जिल्हयात पावसास सुरुवात झाली.
मे महिन्यात जिल्हयात सर्वाधिक २३९ मि. मी. पाऊस घनसावंगी तालुक्यात झाला. २८ मे रोजी जिल्हयातील १८ महसूल मंडलांत अतिवृष्टीची नोंद झाली होती. मे महिन्यात जिल्हयात पावसाचे सरासरी १६ दिवस होते. १ मे ते १५ जून दरम्यान जिल्हयात सरासरी २६६ मि. मी. पाऊस झाला.
जून महिन्यातील पहिल्या पंधरवड्यात जिल्ह्यात सर्वाधिक ९४ मि.मी. पावसाची नोंद बदनापूर तालुक्यात झाली. तर सर्वात कमी ३२ मि.मी. पाऊस परतूर तालुक्यात झाला. यावर्षी २८ मे या एकाच दिवशी सरासरी ४४ मि. मी. पावसाची नोंद झाली.गेल्या वर्षी जून ते डिसेंबर या सात महिन्यांत सरासरी ९२४ मि.मी. पावसाची नोंद जिल्हयात झाली होती. यापैकी ११० मि.मी. पाऊस पावसाळ्याच्या चार महिन्यांनंतर ऑक्टोबर ते डिसेंबर या तीन महिन्यांत झाला होता.