लोकसभा निवडणूक कधीही जाहीर होऊ शकते अशी स्थिती आहे. याचं कारण आता भाजपाने बुधवारी संध्याकाळी दुसरी यादीही जाहीर केली आहे. या यादीत महाराष्ट्रातल्या २० जणांची नावं आहेत. पंकजा मुंडे, सुधीर मुनगंटीवार यांना लोकसभेसाठी संधी देण्यात आली आहे. अशात भाजपातलं इनकमिंग काही थांबलेलं नाही. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाचे नेते जयंत पाटील हे भाजपात जातील अशा चर्चा मध्यंतरीच्या काळात रंगल्या होत्या. मात्र या चर्चा त्यांनी फेटाळल्या. मी आहे तिथेच मला राहुद्या असं जयंत पाटील यांनी म्हटलं होतं. आता त्यांनी पहाटेचा शपथविधी माझ्यासाठीही होऊ शकतो असं वक्तव्य केलं आहे.

नाशिक जिल्ह्यातील निफाड येथे बुधवारी महाविकास आघाडीच्या एकजुटीची महासभा संपन्न झाली. या सभेत जयंत पाटील यांनी केलेल्या वक्तव्यामुळे सगळ्यांचंच लक्ष वेधलं आहे.

जयंत पाटील काय म्हणाले?

“राज्यात उद्घटनांची रीघ लागली आहे. कोट्यावधी रुपयांचे निर्णय घेतले जात आहेत. जणू काही हे पैसे आपल्याला द्यायचेच नाहीत, फक्त जाहीर करायचे आहेत ही भावना आहे. महाराष्ट्रातला निकाल वेगळा लागेल या धास्तीने तिजोरीत असेल तेवढं द्या ही भूमिका घेतली आहे.”

हे पण वाचा- केंद्रीय निवडणूक आयुक्तांनी राजीनामा का दिला हे समोर आले पाहिजे; जयंत पाटील यांचा केंद्र सरकारवर हल्लाबोल

“आता अब की बार ४०० पार ची घोषणा आहे. यांनी एकदा का हा आकडा गाठला की, संविधानाला धक्का लावण्याचे काम सुरू होणार का? ही भीती आहे. जीएसटी, नोटबंदी शेतकरीविरोधी-कामगारविरोधी कायदे यामुळे जनता त्रस्त आहे. तुमच्या घोषणांची खैरात नको आमच्या शेतकऱ्याला आधारभूत किंमत द्या. आज २०५ कोटींचे कर्ज भारतावर आहे, म्हणजे तुमच्या आमच्या डोक्यावर हा कर्जाचा बोजा आहे. सोयाबीन, कापसाचे दर पडले आहेत. कांद्यावर निर्यात बंदी आहे” हा उल्लेख जयंत पाटील यांनी केला.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

तर माझ्यासाठीही पहाटेचा शपथविधी होऊ शकतो..

“महाराष्ट्रात अस्थिर असणाऱ्या भाजपला पश्चिम महाराष्ट्रातील आपले संघटन मजबूत करायचे आहे. म्हणून भाजपाचे नेते आपल्याभोवती जाळे फेकत आहेत. एका फोनवर माझ्यासाठी पहाटेचा शपथविधी कार्यक्रमही होऊ शकतो. परंतु ज्यांनी आपले राजकीय जीवन फुलवले आहे, अशा शरद पवारांसाठी आपण कोणताही त्याग करायला तयार आहोत” असं जयंत पाटील म्हणाले आहेत. जयंत पाटील यांच्या या वक्तव्याने सगळ्यांचंच लक्ष वेधलं आहे.