लोकसभा निवडणुकीचा पहिला टप्पा पुढील आठवड्यात १९ एप्रिल रोजी पार पडत आहे. या पार्श्वभूमीवर सध्या प्रचाराची रणधुमाळी चालू आहे. अशातच राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवार गटाचे नेते प्रफुल्ल पटेल यांनी शरद पवार यांचा उल्लेख करत मोठा राजकीय दावा केला आहे. ‘राष्ट्रवादी काँग्रेसचा अजित पवार गट सरकारमध्ये सहभागी झाल्यानंतर शरद पवारदेखील भाजपाबरोबर येण्यास ५० टक्के अनुकूल होते’, असा दावा प्रफुल्ल पटेल यांनी ‘एएनआय’ला दिलेल्या मुलाखतीत केला आहे. यावर वेगवेगळ्या राजकीय प्रतिक्रिया येऊ लागल्या आहेत. अशातच शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनीदेखील यावर भाष्य केलं आहे.

जयंत पाटील म्हणाले, शरद पवार असं कधी म्हटले नाहीत. हेच लोक (प्रफुल्ल पटेल आणि त्यांचे सहकारी) सतत जाऊन शरद पवारांकडे आग्रह करत असतील, त्यावर शरद पवार किती वेळा आणि काय-काय बोलणार. त्यांनी एखादी गोष्ट मनावर घेतली तर ते पूर्ण करूनच स्वस्थ बसतात. परंतु, त्यांनी नेहमीच मनाविरोधातल्या गोष्टी टाळण्याचा प्रयत्न केला. उलट शरद पवार यांना पक्षसंघटना एकत्रित ठेवायची होती. त्यामुळे असं कोणीही काहीही बोलत असतील तर शरद पवारांनी या लोकांची समजूत काढली असेल.

दरम्यान, प्रफुल्ल पटेल यांच्या वक्तव्यावर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीदेखील प्रतिक्रिया दिली आहे. फडणवीस म्हणाले, “मी आता या निवडणुकीत त्यावर काही बोलणार नाही. मी याआधीदेखील या विषयावर बोललो आहे. पण हे सत्य आहे”

हे ही वाचा >> महायुतीत ठाणे लोकसभा भाजपाला? आमदार संजय केळकर इच्छुक; म्हणाले, “पूर्वीची गोष्ट वेगळी होती, आता…”

फडणवीसांपाठोपाठ पटेलांच्या दाव्यावर स्वतः शरद पवार यांनी भाष्य केलं आहे. शरद पवार म्हणाले, पटेलांनी तसं वक्तव्य केलं असलं तरी आतापर्यंत तुम्हाला काय वस्तुस्थिती दिसते. मी भाजपाबरोबर जायला पाठिंबा दिला, असे ते म्हणाले. पण भाजपामध्ये कुणी गेलं का? तर अजिबात नाही.