छत्रपती संभाजीनगर:समृद्धी महामार्गावर आता लूटमारीच्या घटना घडत असल्याचे समोर येत आहेत. पालघर जिल्ह्यातील बोईसर येथे वैद्यकीय व्यवसाय करणाऱ्या डॉक्टर दांपत्याला करमाड पोलीस ठाण्याच्या हद्दीपासून दोन किलोमीटर दूर अंतरावर गाडी अडवून लुटण्यात आले. या घटनेत डॉक्टर महिलेसह त्यांच्या आईच्या अंगावरील साडे चौदा तोळे सोन्याचे दागिने लुटून व जिवे मारण्याची धमकी देत पळवण्यात आले. ही घटना २ मे रोजी रात्री सव्वा दहाच्या सुमारास घडली. विशेष म्हणजे आम्ही इन्शुरन्सवाले आहोत, अशी बतावणी करून डॉक्टर दांपत्याच्या कारसमोर लुटारुंनी त्यांची कार लावून अडवले. डॉक्टरांच्या कारची चावी काढून घेऊन त्यांना मारहाण करण्यास सुरुवात केली. त्याचा जाब विचारताच जीवे मारण्याची धमकी दिली, अशी तक्रार डॉक्टर चैताली श्रावण शिंगणे यांनी चिकलठाणा पोलीस ठाण्यात ३ मे रोजी सायंकाळी नोंदवली. याप्रकरणी अज्ञात तीन व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

तक्रारीनुसार डॉ. चैताली शिंगणे व त्यांचे पती श्रावण शिंगणे हे डॉक्टर दांपत्य त्यांचे मूळ गाव असलेल्या मेहकर येथे आले होते. चैताली शिंगणे यांच्या मावसदिराच्या लग्नासाठी म्हणून १ मे रोजी आधी शेलगाव देशमुख (ता. मेहकर) व लग्न गाव असलेले पोखरी फाटा शिवाजीनगर येथे गेले होते. तेथून परत मेहकर येथेआले होते. २ मे रोजी रात्री बोईसर कडे परतत असताना त्यांना समृद्धी महामार्गावरील नाथ नगर परिसरात एक कार आडवी समोर आणून अडवण्यात आले. तिघे अज्ञात व्यक्ती उतरले व इन्शुरन्सवाले आहोत म्हणून त्यांच्या कारची चावी काढण्यात आली.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

श्रावण शिंगणे यांना मारहाण करण्यास सुरुवात केली त्याचा जाब विचारत असताना चैताली शिंगणे यांच्या अंगावरील व त्यांच्या आई मीना निंभोरे यांच्याही अंगावरील दागिने हिसकावून घेण्यात आले. एक मोबाईलही त्यांच्याकडून घेतला या मोबाईलद्वारेचैताली या त्यांच्या पतीला मारहाण करतानाचे छायाचित्रण करत होत्या तो तोडण्यात आला. या घटनेमध्ये चैताली शिंगणे यांचे दीड तोळ्याचे मंगळसूत्र चार तोळ्याची सोन्याची मोठी पोत, दोन तोळ्याचा लक्ष्मी हार, दोन तोळ्याची छोटी पोत व पाच तोळ्याची मोठी पोत असे एकूण साडे चौदा तोळे सोन्याचे दागिने लुटून व धमकावून नेण्यात आले, असे तक्रारीत नमूद केले आहे.