राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद पवार गटाचे नेते जितेंद्र आव्हाड हे आक्रमकपणे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावर टीका करू लागले आहेत. आव्हाड यांच्या अजित पवारांवरील टीकेला अजित पवार गटातील नेते उत्तर देऊ लागले आहेत. कृषीमंत्री धनंजय मुंडे यांनी आव्हाडांच्या टीकेला उत्तर देताना त्यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. आव्हाड हे शरद पवार गटात स्वतःची जागा निर्माण करण्यासाठी वेगवेगळी वक्तव्ये करत असल्याचा आरोप मुंडे यांनी केला आहे. तसेच “जितेंद्र आव्हाड यांनी पवार कुटुंबियांमध्ये अंतर निर्माण करण्याचं काम केलं. आज आव्हाड भावनिक असल्याचं दाखवतात. याचं प्रमुख कारण म्हणजे अजित पवार वेगळे झाल्यानंतर शरद पवार गटात जयंत पाटील आणि सुप्रिया सुळे नसाव्यात आणि एकटे आपणच नेते व्हावे, असा त्यांचा प्रयत्न दिसत आहे”, असं वक्तव्य मुंडे यांनी केलं आहे.

दरम्यान, मुंडे यांच्या आव्हाडांवरील आरोपांना थेट शरद पवार यांनी उत्तर दिलं आहे. जितेंद्र आव्हाड हेच शरद पवारांच्या घराण्याचं वाट्टोळं करणारे खरे गद्दार आहेत, अशी टीका मुंडे यांनी केली होती. त्यावर शरद पवार म्हणाले, अजिबाबत नाही. धनंजय मुंडे जे काही बोलले ते चुकीचं आहे. मुंडेंनी किती वर्षे राष्ट्रवादीत काम केलं? मुंडेंनी राष्ट्रवादीत जितकी वर्षे काम केलं आहे त्यापेक्षा कितीतरी वर्षे आधी आव्हाड पक्षात सहभागी झाले. मुंडेंच्या आधीपासून आव्हाड पक्षासाठी काम करत आहेत. त्यांनी देशपातळीवरही पक्षासाठी, संघटनेसाठी काम केलं आहे, आव्हाडांनी देशातील तरुणांचं नेतृत्व केलं आहे, महाराष्ट्राच्या विधीमंडळात काम केलं आहे, यासह त्यांनी राज्याच्या मंत्रिमंडळातही काम केलं आहे. त्यामुळे आव्हाड यांना पक्षाची भूमिका मांडण्याचा अधिकार आहे. आव्हाडांनी पक्षाच्या विरोधात भूमिका घेतलेली नाही. तसेच जितेंद्र आव्हाडांनी काय बोलावं याबाबत अन्य लोकांनी त्यांना मार्गदर्शन करण्याची गरज नाही.

Rohit pawar on sunetra pawar
“डोळ्यात पाणी आले, पण त्यापेक्षा…” भावूक झालेल्या सुनेत्रा पवार यांच्याबाबत रोहित पवारांची प्रतिक्रिया
eknath shinde devendra fadnavis
महायुतीत वादाची ठिणगी? भाजपा आमदार शिंदे गटातील खासदारावर टीका करत म्हणाले, “भ्रष्टाचाऱ्यांना…”
shashikant shinde
निष्ठा बदलली नाही म्हणून होणाऱ्या परिणामांना भीत नाही; शशिकांत शिंदे यांचा कणखर बाणा
Ramdas Athawale, raj thackeray
“महायुतीला राज ठाकरेंच्या पाठिंब्याची गरज नव्हती, मात्र…”, रामदास आठवले यांची प्रतिक्रिया; म्हणाले…

दरम्यान, शरद पवार यांनी जितेंद्र आव्हाडांच्या आरोपांवर दिलेल्या प्रतिक्रियेचा व्हिडीओ जितेंद्र आव्हाड यांनी एक्स या मायक्रोब्लॉगिंग प्लॅटफॉर्मवर शेअर केला आहे. तसेच धनंजय मुंडेंना उद्देशून “लायकी समजली का? गद्दारी रक्तात असलेल्यांना निष्ठा काय समजणार” असं कॅप्शन दिलं आहे.

धनंजय मुंडे काय म्हणाले होते?

धनंजय मुंडे प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधींसमोर आव्हाडांचा नामोल्लेख टाळत म्हणाले, त्यांनी शरद पवारांबरोबर किती वेळा गद्दारी केली आहे याचा लेखाजोखा पवारांकडे असेल. गद्दारांनी गदारीची भाषा करणँ शोभत नाही. आम्ही अद्याप मर्यादा ठेवून बोलतोय. आम्ही मर्यादा बाजूला ठेवून बोलू लागल्यावर… आम्हालाही खूप काही बोलता येईल. कोण खरा गद्दार आहे? शरद पवारांच्या घरात कोणी घरात आगडोंब लावून सगळ्या गोष्टी केल्या? हे स र्वांना माहिती आहे. २०१९ लाही सर्वांना माहिती होतं आणि २०२३ लाही माहिती होतं. तुम्ही (पत्रकारांनी) ज्यांचं नाव घेतलं तेच (जितेंद्र आव्हाड) पवार घराण्याचं वाट्टोळं करणारे खरे गद्दार आहेत.

शरद पवार काय म्हणाले?

आव्हाड आणि मुंडे यांच्यात आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झडत असताना पत्रकार परिषदेत शरद पवार यांना याबाबत प्रश्न विचारण्यात आला. त्यावर शरद पवार म्हणाले, राष्ट्रवादी काँग्रेसचे युवक अध्यक्ष ते राज्यातील कॅबिनेट मंत्री असा त्यांचा प्रवास राहिला आहे. पक्षाच्या संघटना पातळीवरही त्यांनी काम केलं आहे. त्यामुळे जितेंद्र आव्हाड यांना पक्षाची भूमिका मांडण्याचा पूर्ण अधिकार आहे. तसेच आव्हाडांनी काय बोलावं हे त्यांना इतरांनी सांगण्याची आवश्यकता नाही.