करोनाच्या पार्श्वभूमीवर देशातील वेगवेगळ्या राज्यांमधील स्थलांतरित मजुरांनी आपल्या राज्यांकडे जाण्यास सुरुवात केली आहे. अनेक मजुरांचे लोंढेच्या लोंढे राष्ट्रीय महामार्गांवरुन आपल्या मूळ राज्यांकडे निघाल्याचे चित्र मागील एका महिन्यापासून देशभरामध्ये दिसत आहेत. त्यातही उत्तर प्रदेश, बिहारसारख्या राज्यामध्ये जाणाऱ्या मजुरांची संख्या मोठ्या प्रमाणात असल्याचे दिसून येत आहे. याच पार्श्वभूमीवर राज्याचे गृहविकास मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी एक मराठी मजुरांचा एकही लोंढा महाराष्ट्रात चालत आलेला नाही असा टोला लगावत महाराष्ट्राच्या माजी मुख्यमंत्र्यांचे कौतुक केलं आहे. आव्हाड यांनी ट्विटवरुन यासंदर्भात एक पोस्ट शेअर केली आहे.

२५ मार्च पासून सुरु असणाऱ्या देशव्यापी लॉकडाउन ३१ मे पर्यंत सुरु राहणार आहे. मात्र या कालावधीमध्ये लाखो स्थलांतरित मजूर हाताला काही काम नसल्याने स्वत:च्या राज्यात परत निघाले आहेत. हातावर पोट असणारे अनेक मजूर आपल्या राज्यांमध्ये परत जात असताना महाराष्ट्रामध्ये मात्र मराठी मजूर येत नसल्याचे निरिक्षण आव्हाड यांनी नोंदवलं आहे. यासाठी त्यांनी महाराष्ट्रातील आधीची मुख्यमंत्र्यांनी राज्याला प्रगतीच्या मार्गावर नेल्यानेच हे चित्र दिसत असल्याचं म्हटलं आहे.

काय आहे या पोस्टमध्ये

आव्हाड यांनी ‘पटले तर रिट्विट करा प्लिज’ या कॅफ्शनने एका पोस्टचा स्क्रीनशॉर्ट शेअर केला आहे. या स्क्रीनशॉर्टमध्ये, “उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश, बिहार, गुजरात, राजस्थानमधून मराठी मजुरांचा एकही लोंढा महाराष्ट्रात चालत आला नाही, एकही ट्रेन, एकही बस भरुन आली नाही? कारण यशवंतराव (चव्हाण), वसंतदादा (पाटील), सुधाकरराव (नाईक), शंकरराव (चव्हाण), शरदराव (शरद पवार), विलासराव (देशमुख) या सुसंस्कृत मुख्यमंत्र्यांच्या नेतृत्वात घडलेला स्वयंपूर्ण आणि समृद्ध असलेला हा महाराष्ट्र (आहे)”, असा मजकूर दिसत आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

आव्हाड यांनी २० मे रोजी दुपारी दोन वाजता शेअर केलेली ही पोस्ट प्रचंड व्हायरल झाली असून २४ तासांच्या आत दोन हजार ७०० हून अधिक जणांनी ती रिट्विट केली आहे. तर ९ हजारहून अधिक जणांनी ती लाइक केली आहे.