सांगली : कृष्णाकाठी आमणापूरच्या भावई उत्सवात जोगणीने बाजी मारल्याने यंदाचा पाऊसकाळ चांगला जाणार असल्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला. बारा बलुतेदारांच्या सहभागाने आमणापूरचा भावई उत्सव मोठ्या उत्साहात आणि पावसात पार पडला.अनेक पिढ्यांची परंपरा असलेला भावई उत्सव मुलापासून थोरापर्यंत दरवर्षी आकर्षण असते. या उत्सवाने गावखेड्यातील विविध व्यवसायातील बारा बलुतेदारांना वेगवेगळा मान मिळत असल्याने सामाजिक ऐक्य साधण्याचा प्रयत्न होतो. गावगाड्यातील कुंभार, नाभिक, माळी, तराळ, रामोशी, दलित, सुतार, मतकरी, जंगम, मराठा, परीट, गुरव व कोळी हे समाज एकत्रित येऊन हा लोकोत्सव साजरा करित आहेत. यामध्ये पोलीस पाटील, राडे-फडणे, उगळे, कुलकर्णी, सुतार -पाटील यांना पंचाचा मान आहे.
यावर्षीच्या उत्सवात सकाळी महादेव मंदिरातून दिवा काढण्याची परंपरा पार पाडण्यात आली. दिव्यावर गाढवकीडा, मिर्गी कीडा निघाल्यावर यंदा जोरदार पाऊस असल्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला. दिवा पूजनाचा मान गजानन कुलकर्णी यांच्या घरी आला. तर पिसे (देवीचे हेर) होण्याचा मान प्रकाश सूर्यवंशी व सौरभ कोळी यांनी घेतला.दुपारी पारंपरिक प्रथेप्रमाणे वर्गणी मागून बारा बलुतेदारात वाटण्यात आली. जोगण्याचा मान नाभिक समाजात सुभाष सूर्यवंशी तर जोगणी होण्याचा मान कुंभार समाजातील तानाजी कुंभार यांना मिळाला. सायंकाळी पारंपरिक वेशात जोगणा-जोगणीची दौड बलुतेदारांच्या सशस्त्र संरक्षणात संपन्न झाली. यामध्ये जोगणी तानाजी कुंभार यांनी अंतिम चुरशीच्या क्षणी बाजी मारली.
यंदाच्या कार्यक्रमातील तरुणाईचा सहभाग मोठा दिसला. कार्यक्रम शांततेत पार पाडण्यासाठी सरपंच, आमणापूर ग्रामपंचायत व ग्रामस्थांचे सहकार्य लाभले. उत्सव पाहण्यासाठी पंचक्रोशीतील भाविक व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.