कराड : केंद्र व राज्य शासनाच्या नवनवीन योजना या लोकोपयोगी असतात. या योजना, अधिकारी कर्मचाऱ्यांनी प्रभावीपणे राबविण्यासाठी जनतेपर्यंत पोहोचवले पाहिजे, या योजना समजवून सांगितल्या पाहिजेत, असे आवाहन जिल्हाधिकारी संतोष पाटील यांनी केले.
तारळे (ता. पाटण) येथे महसूल सप्ताहानिमित्त आयोजित छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबिरात ते बोलत होते. उपविभागीय अधिकारी तथा प्रांताधिकारी सोपान टोम्पे, तहसीलदार अनंत गुरव, सामाजिक कार्यकर्ते अभिजित पाटील, बबनराव शिंदे, सरपंच प्रकाश जाधव, रामभाऊ लाहोटी, अभिजित जाधव, गजाभाऊ जाधव, संजय देशमुख, मंडलाधिकारी किशोर वाडकर आदी महसूल अधिकारी, कर्मचाऱ्यांसह नागरिकांची उपस्थिती होती.
संतोष पाटील म्हणाले, ‘रयतेचे राज्य छत्रपतींची संकल्पना, हे सरकार पण, रयतेचे म्हणजे जनतेचे आहे. याचाच आधार घेत या योजनेला छत्रपतींचे नाव दिले आहे. या शिबिरातून आतापर्यंत आठ- दहा हजार दाखले वितरित केले आहेत. शेतीच्या रस्त्याचे प्रश्न प्राधान्याने मिटविले पाहिजेत. बांध कोरण्यापेक्षा रस्त्याचे प्रश्न मिटवून टाका. खटल्यांमध्ये अडकून राहू नका, रस्त्यांसाठी महसूल विभाग तुम्हाला सहकार्यासाठी तयार आहे, पाटण तालुका हा राज्यात एक नंबरला आणूयात, त्यासाठी तहसीलदार व प्रांताधिकाऱ्यांना तुमचे सहकार्य हवे असल्याचे जिल्हाधिकारी पाटील यांनी सांगितले.
प्रशासनाने अधिक गतिमान होवून शासनाच्या योजना व उपक्रम घराघरात. अगदी शेवटच्या घटकापर्यंत पोहोचवाव्यात, लोकांची कामाने विनाविलंब, विनासायास कशी पार पडतील याला प्रथम प्राधान्य द्यावे, गतिमान प्रशासन हे पहिले कर्तव्य असल्याचे भावनेने सतत कृतीशील राहावे असेही आवाहन संतोष पाटील यांनी या वेळी बोलताना केले.
सोपान टोम्पे यांनी प्रस्ताविकात शिबिराचा उद्देश सांगितला. तारळे, आवर्डे मंडलात आतापर्यंत तीन हजार लाभार्थ्यांना विविध लाभ दिले आहेत. वारस नोंदी, अपाक नोंदी, विविध दाखले, कातकरी बांधवांना जातींचे दाखले, ४८ कुटुंबांना सातबारा वाटप केले असून, त्यांच्या घरांचा प्रश्न मिटवला आहे. आरोग्य शिबीर, फार्मर आयडी शिबीर अशा अनेक योजना यशस्वी राबविल्याचे टोम्पे यांनी सांगितले.
येथील कातकरी समाजातील ४८ कुटुंबांसाठी घरे बांधली जाणार आहेत. त्यासाठी व्यवस्थित नियोजन करून वसाहत बांधा असे सुचवताना, या कामासाठी जिल्हाधिकारी पाटील यांनी तहसीलदार अनंत गुरव व उपविभागीय अधिकारी सोपान टोणपे यांचे कौतुक केले. गटविकास अधिकाऱ्यांनी जातीने लक्ष घालून केवळ घरे उभारून थांबू नका, येथील लोकांना इतर मूलभूत सुविधा पुरवा अशाही सूचना जिल्हाधिकाऱ्यांनी केल्या.