कराड : कृष्णा विश्व विद्यापीठाने वैद्यकीय अन् आरोग्यक्षेत्रात स्वतंत्र ओळख निर्माण केली. विद्यापीठाला मिळालेली राष्ट्रीय पातळीवरील मानांकने ही विद्यापीठाची गुणवत्तापूर्ण आरोग्यसेवा, शिक्षण, संशोधन कार्यातील आदर्श प्रतीकेच असल्याचे गौरवोद्गार राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन यांनी काढले.
कृष्णा विद्यापीठाच्या १३ व्या दीक्षांत सोहळ्याप्रसंगी दूरदृश्यप्रणालीद्वारे ते बोलत होते. अध्यक्षस्थानी कुलपती डॉ. सुरेश भोसले होते. कुलपतींचे प्रधान सल्लागार डॉ. वेदप्रकाश मिश्रा, कुलगुरू डॉ. नीलम मिश्रा, आमदार डॉ. अतुल भोसले आदींची प्रमुख उपस्थिती होती. समारंभात विविध अधिविभागातील १ हजार ६२ विद्यार्थ्यांना पदवी. सर्वोत्कृष्ट २५ विद्यार्थ्यांना विशेष पदक तर, ३० विद्यार्थ्यांना विद्यावाचस्पती पदवी देऊन सन्मानित करण्यात आले.
राज्यपाल राधाकृष्णन विद्यार्थ्यांना उद्देशून म्हणाले, तुम्ही आज शैक्षणिक प्रवासातील महत्त्वाचा टप्पा पार केला. तुमचे पालक, शिक्षक, मार्गदर्शकांच्या सततच्या पाठिंब्यामुळेच ही कामगिरी शक्य झाली. प्रामाणिकपणे, करुणेने व व्यावसायिकतेने समाजाची सेवा करा आणि शक्य झाल्यास परदेशी भाषाही नक्की शिका. व्यक्तिमत्त्व विकासासह जागतिक दृष्टिकोनातून ते फारच उपयुक्त ठरेल.
डॉ. सुरेश भोसले म्हणाले, की कृष्णा विद्यापीठाने वैद्यकीय महाविद्यालय ते स्वयंपूर्ण विद्यापीठ असा उल्लेखनीय प्रवास पार केला. अग्रगण्य शैक्षणिक संस्था म्हणून सर्वदूर स्वतंत्र ओळख निर्माण केली. नजीकच्या कालावधीत विद्यापीठाच्या नव्या संकुलातून माहिती तंत्रज्ञान, व्यावसायिक शिक्षण, कौशल्याधारित अभ्यासक्रमांना प्राधान्य देण्यात येईल. २०२७-२८ सालातील शैक्षणिक वर्षात विद्यार्थ्यांची पहिली तुकडी या संकुलात प्रवेश घेईल.
‘कृष्णा’च्या अनेक विद्यार्थ्यांनी वैद्यकीय परीक्षांमध्ये उल्लेखनीय कामगिरी केली. अनेकांनी पदव्युत्तर, अतिविशेषज्ञता (सुपरस्पेशालिटी) अभ्यासक्रमांमध्येही यश मिळवले. ‘कृष्णा’च्या विद्यार्थ्यांना देशभरातील नामांकित रुग्णालये, संशोधन, आरोग्य विज्ञान संस्थांमध्ये कामाची संधी मिळत आहेत. राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाच्या अनुषंगाने, बहुविषयक शिक्षणाला चालना देण्यासाठी विद्यापीठ प्रयत्नशील आहे. पर्यावरण रक्षण, राष्ट्रीय एकात्मता, लोकशाही मूल्ये, सार्वजनिक जबाबदाऱ्यांसारख्या विषयांवरही विद्यापीठ विशेष लक्ष केंद्रित करत असल्याचे डॉ. भोसले यांनी सांगितले.
डॉ. नीलम मिश्रा म्हणाल्या, विद्यापीठाने विद्यार्थ्यांना केवळ ज्ञानच न देता मूल्याधिष्ठित नेतृत्वाची प्रेरणाही दिली. विद्यार्थ्यांनीही विविध क्षेत्रांत उल्लेखनीय कामगिरी करत कृष्णा विद्यापीठाचे नाव उंचाविले आहे.