कराड : विवाहितेची अश्लील चित्रफीत समाजमाध्यमावर प्रसारित केल्याप्रकरणी पीडित महिलेच्या फिर्यादीनंतर कराड ग्रामीण पोलीस ठाण्यात एकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी, की तालुक्यातील एका गावातील पीडित महिलेची संशयिताशी ओळख झाली. त्या ओळखीचा फायदा घेत त्याने विवाहितेशी जवळीक वाढवली. तसेच तुझे इतरांशी बोलतानाची छायाचित्रे माझ्याकडे आहेत. ती तुझ्या घरी दाखवून तुझी बदनामी करेन, अशी धमकी देत त्याने १० मे २०२३ पासून विवाहितेवर वारंवार अत्याचार केला. या दरम्यानच त्याने चोरून चित्रफीत तयार केली.

सुरुवातीला भीतीपोटी विवाहितेने याबाबतची माहिती कोणालाही दिली नाही. मात्र, संशयिताने वारंवार हाच प्रकार केल्यामुळे पीडितेने याबाबत आपल्या भावाला माहिती दिली. भावाने संशयिताला बोलावून घेत समज दिली. मात्र, त्यानंतरही त्याने पीडितेला त्रास देणे सुरूच ठेवले.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

दरम्यान, संशयिताने पीडितेच्या नावाने अश्लील वेबसाइटवर खाते उघडले. हा प्रकार निदर्शनास आल्यानंतरही संशयिताला ताकीद देण्यात आली. पीडिता कुटुंबासह मुंबईला राहण्यास गेली. तरीही संशयिताकडून तिला त्रास देणे सुरूच होते. चार दिवसांपूर्वी त्याने पीडितेची अश्लील चित्रफीत समाजमाध्यमावर प्रसारित केली. ती पीडितेच्या कुटुंबीयांनी पाहिल्यानंतर त्यांनी याबाबत तिच्याकडे विचारणा केली. त्या वेळी तिने घडलेला सर्व प्रकार कुटुंबीयांना सांगितला. याबाबत पीडितेने दिलेल्या तक्रारीवरून कराड ग्रामीण पोलीस ठाण्यात संशयितावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.