कराड : मद्यपी पतीच्या सततच्या त्रासाला कंटाळून पत्नीने मुलगा व मुलीला सोबत घेऊन पतीचा खून केल्याची धक्कादायक घटना पाटण तालुक्यातील सवारवाडी येथे घडली. याप्रकरणी पोलिसांनी पत्नी, मुलगा आणि मुलीला अटक केली आहे.
उंब्रज पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, खून झालेल्या व्यक्तीचे नाव रमेश कोंडिबा खरात (४५) आहे. या प्रकरणी पत्नी लक्ष्मी रमेश खरात (४२), मुलगा हरीश (२२, रा. सवारवाडी, ता. पाटण) आणि मुलगी अश्विनी उमेश शिंदे (२४, रा. नागठाणे, ता. सातारा) यांना खुनाच्या गुन्ह्यात अटक केली आहे. रमेश खरात दारूच्या व्यसनाधीन होते. काहीही कामधंदा करत नव्हते. ते क्षुल्लक कारणावरून पत्नी लक्ष्मीला वारंवार मारहाण करत असत. त्यांच्या आवडीची भाजी घरात केली नसल्यामुळे पत्नीला मारहाण केली.
मुलगी अश्विनी शिंदे वाद सोडविण्यासाठी आल्यावर तिलादेखील मारहाण केली. ही घटना अश्विनीने तिचा भाऊ हरीशला सांगितल्यानंतर तो घरी आला. या वेळी रमेश खरात यांनी पुन्हा पत्नी, मुलगा व मुलीशी वादावादी करून, शिवीगाळ सुरू केली. अखेर सततच्या त्रासाला कंटाळून या तिघांनी त्यांना लाकडी दांडक्याने मारहाण केली. यात रमेश खरात गंभीर जखमी झाले. रुग्णालयात नेण्यापूर्वीच त्यांचा मृत्यू झाला.