कराड : पाटण तालुक्यातील जानुगडेवाडी जवळील धोकादायक वळणावर खाजगी प्रवासी वाहतूक करणाऱ्या बसला वाचवताना एसटी बस चालकाचा ताबा सुटून ही बस झाडावर धडकल्याने विद्यार्थ्यांसह ३० जण जखमी झाल्याची घटना गुरुवारी सकाळी घडली.
निर्मला अशोक मगरे, पल्लवी अमित पवार, संभाजी सिताराम कुंभार हे या अपघातात गंभीर जखमी झाले आहेत. त्यांना कराड येथे उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. तर अन्य जखमींवर ढेबेवाडी ग्रामीण रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
याबाबत माहिती अशी, की पाटण आगाराची एसटी बस (क्र. एमच- १४, बीटी ११२७) सळवे येथून पाटणकडे निघाली होती. दरम्यान, जानुगडेवाडी नजीक कराडहून येणारी खासगी प्रवासी बस अचानकपणे समोरुन भरधाव वेगाने आल्याने बस चालकाचा ताबा सुटल्याने बस रस्त्याकडेच्या झाडावर धडकली. त्यात बस चालक, वाहकासह ३० जण जखमी झाले.
चालक आरिफ निजाम मुल्ला (५७ रा. कोळे, ता. कराड), वाहक आर. एम. काळे (५७ रा. मालदन, ता. पाटण), सरिता धनाजी जाधव (५३) सीताबाई नायकु मगरे (६१) रंजना सुरेश मगरे (५८) बाळाबाई शिवाजी मगरे (५८) शोभा भगवान मगरे (५०) निर्मला अशोक मगरे (४२) शोभा परशुराम जाधव (६५) शारदा सोनवणे (५०) छाया तानाजी जाधव (४४) धनाजी अंतू जाधव (५८, सर्व रा. सणबूर ता.पाटण), तुकाराम ज्ञानू भाईगडे (५९), तुकाराम गणपती यादव (५०) संपदा हनुमंत पुजारी (५०), शारदा सुरेश परीट (५०), यश जालिंदर बोरगे (१७) रोहिणी राजाराम गुरव (सर्व रा. सळवे), जिजाबाई जयसिंग चोरगे (७०), सुमन वसंत चोरगे (६०, रा. शिंदेवाडी),
कमल शिवाजी जगदाळे (६०), बाळू नाना साळुंखे (५६), पल्लवी सुमित पवार (२६), सीताबाई वसंत लोहार (५०), श्रावणी सतीश पाटील (१५), आराध्या सतीश पाटील (१३), प्रगती रवींद्र पाटील (१५), समर्थ विक्रम जगदाळे (१९, सर्व रा. बनपुरी) मालन बाळासो साळुंखे (६४), जया बाळासाहेब साळुंखे (६८ सर्व रा. महिंद) यांचा जखमींमध्ये समावेश आहे.
दरम्यान, पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी जखमींच्या उपचारात कोणत्याही प्रकारची हयगय नको, दक्षता घ्यावी असे निर्देश दिले. जिल्हाधिकारी संतोष पाटील, पालकमंत्री शंभूराजेंचे विशेष कार्य अधिकारी सुनील गाढे यांनी जखमींची विचारपूस केली आहे.