कराड : आमदार डॉ. अतुल भोसले हे दमदार नेतृत्व असून, पक्षाने त्यांना आतापर्यंत दिलेल्या सर्व जबाबदाऱ्या त्यांनी सक्षमपणे पेलल्या आहेत. त्यामुळे पक्ष नेतृत्वाने त्यांना सातारा जिल्हाध्यक्षपदाची जबाबदारी सोपवली आहे. त्यांच्या नेतृत्वाखाली सातारा जिल्हा संपूर्णत: भाजपमय होईल, अशी प्रशंसा भाजपचे प्रदेश कार्याध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी केली.
कराडमध्ये पत्रकारांशी ते बोलत होते. चव्हाण म्हणाले, डॉ. अतुल भोसले यांनी अहिल्यादेवी होळकर यांच्या तीनशेव्या जयंतीनिमित्त भव्य महिला मेळावा आणि कार्यकर्त्यांचा पक्षप्रवेश अशा संयुक्त कार्यक्रमाचे आयोजन केले. यानिमित्त त्यांच्या कार्याचे कौतुक करण्यासाठी आपण आज येथे आलो आहोत. महिला मेळावा कार्यक्रमात जवळपास १० हजार बांधकाम कामगार महिलांना भांडी वाटप करण्यात आले, ही कौतुकाची बाब असल्याचे चव्हाण यांनी सांगितले. सातारा जिल्हाध्यक्षपदी डॉ. भोसले यांची निवड झाल्याबद्दल चव्हाण यांनी त्यांचे अभिनंदन केले.
पहलगाम येथील भ्याड दहशतवादी हल्ल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली भारतीय सैन्यदलाने राबवलेले ‘ऑपरेशन सिंदूर’ यशस्वी झाले. त्यानंतर देशभरात भारतीय सैन्यदलाच्या समर्थनार्थ १ हजार २५० हून अधिक तिरंगा यात्रा निघाल्या. यामध्ये सातारा जिल्हा, कराड तालुक्यातील मंडलनिहाय तिरंगा यात्रा यशस्वीपणे काढण्यात आल्याबद्दल रवींद्र चव्हाण यांनी डॉ. अतुल भोसले व कार्यकर्त्यांचे या वेळी कौतुक केले.