कराड : ‘ग्रामपंचायत ते विधानसभा, शत प्रतिशत भाजप’ हे उद्दिष्ट असून, त्यानुसार सशक्त भारत निर्माण करायचा आहे. भाजप हीच काळाची गरज असल्याचे लक्षात घेऊन त्यादृष्टीने सर्वांनी पावले उचलावीत, असे आवाहन भाजपचे प्रदेश कार्याध्यक्ष, आमदार रवींद्र चव्हाण यांनी केले.
मलकापूर- कराड येथे भाजपतर्फे आयोजित महिला मेळावा व कार्यकर्ता पक्षप्रवेश कार्यक्रमात ते बोलत होते. आमदार डॉ. अतुल भोसले, माजी आमदार आनंदराव पाटील, राष्ट्रीय खनिज विकास महामंडळाचे नवनिर्वाचित सदस्य भरत पाटील, विक्रम पावसकर, रामकृष्ण वेताळ, धैर्यशील कदम आदींची प्रमुख उपस्थिती होती.
रवींद्र चव्हाण म्हणाले, भारतात शेजारील देश येत्या काळात अतिरेकी हल्ले घडवून आणतील. त्यांना भारतीय सैन्यदल चोख प्रत्युत्तर देईल. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि सैन्यदलाच्या पाठीशी सर्वांनी उभे राहिले पाहिजे. देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वामध्ये महाराष्ट्र विकासाच्या प्रत्येक क्षेत्रात पुढे आहे. देशभरात यापुढे कृषी क्षेत्रात तंत्रज्ञानाच्या माध्यमातून बदल होताना दिसतील. पूर्वीच्या काँग्रेस विचाराच्या राज्यकर्त्यांनी केवळ ‘रोटी, कपडा, मकान’ एवढीच आश्वासने दिली. मात्र, त्यांनी सर्वच बाबतीत जनतेच्या तोंडाला पाने पुसली. मोदींनी प्रत्येक गरिबाला घरे, आयुष्मान भारतच्या माध्यमातून मोफत उपचार दिले, केंद्र व राज्य सरकारच्या विविध योजनांच्या माध्यमातून भरघोस निधी दिल्याचे चव्हाण यांनी सांगितले.
अहिल्यादेवी होळकर यांच्या तीनशेव्या जयंतीनिमित्त महिला मेळाव्यात १० हजार महिलांना भांडी वाटप करण्यात आली. भाजपत अनेकांनी आज पक्षप्रवेश केल्याबद्दल चव्हाण यांनी समाधान व्यक्त केले.
डॉ. अतुल भोसले म्हणाले, अहिल्यादेवी होळकर यांनी सतराव्या शतकात महिलांना स्वायत्तता मिळावी, समान अधिकार मिळावेत, समाजातील त्यांचे स्थान उंचवावे, यासाठी काम केले. त्यांच्या समाजोपयोगी कामाचे अवलोकन करण्यासाठी हा महिला मेळावा घेतला आहे. लाडकी बहीण योजना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सरकार असेपर्यंत बंद पडणार नाही.
अनेकांचा भाजपप्रवेश
कराड तालुक्यातील जखिणवाडीचे माजी सरपंच नरेंद्र पाटील, सरपंच शंकर झिमरे, नांदलापूरचे सरपंच मानसिंग लावंड आदी काँग्रेस व अन्य पक्षातील असंख्य स्थानिक नेते व कार्यकर्त्यांनी मेळाव्यात भाजपप्रवेश केला.