कराड : मलकापूर (ता. कराड) येथील श्री मळाईदेवी शिक्षण संस्थेतर्फे सलग २६ वर्षांपासून बीजारोपण व वृक्षारोपण उपक्रम यशस्वीपणे राबवला जातो. आगाशिव डोंगर परिसराची निवड करून यावर्षीही आनंदराव चव्हाण विद्यालयातील तब्बल सातशे विद्यार्थ्यांनी दोन टप्प्यांत सातशे झाडे लावत ‘एक पेड माँ के नाम’ उपक्रमाची उत्स्फूर्तपणे संकल्पपूर्ती केली.

श्री मळाईदेवी शिक्षण संस्थेचे सचिव अशोकराव थोरात, वनअधिकारी ललिता पाटील यांच्यासह कर्मचारी, प्राचार्या ए. एस. कुंभार, उपमुख्याध्यापक ए. बी. थोरात, शिक्षक, विद्यार्थी व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते. याप्रसंगी वन अधिकाऱ्यांनी विद्यार्थ्यांना वृक्षसंवर्धनाची शपथ दिली.
विद्यार्थ्यांच्या रोपांचे वृक्षारोपण

श्री मळाईदेवी शिक्षण संस्थेकडून हा उपक्रम गेले २६ वर्षे अविरतपणे सुरू आहे. उन्हाळ्याच्या सुटीमध्ये विद्यार्थी जांभूळ, आंबा, चिंच, सुबाभूळ, करंज, सीताफळ, तरवड आदी बियांचे संकलन करतात. तसेच रोपे व बी गोळा (सीड बॉल) तयार करतात. त्यांना त्याचे शास्त्रशुध्द प्रशिक्षण दिले जाते. विद्यार्थ्यांनी बनवलेल्या रोपांचे आगाशिव डोंगरात वृक्षारोपण करण्याची आता जणू परंपराच रूढ झाली आहे.

याबाबत बोलताना अशोकराव थोरात म्हणाले, श्री मळाईदेवी शिक्षण संस्थेचा सामाजिक व पर्यावरण संवर्धनविषयक उपक्रम दिवसेंदिवस अधिकच बहरत चाललेला आहे. विद्यार्थी, शाळा, संस्था, वनविभाग यांच्या प्रेरणेतून हा पर्यावरणविषयक उपक्रमाचा सकारात्मक परिणाम समाजात पाहायला मिळतोय. त्यात विद्यार्थी, पालक व नागरिकांनी स्वयंस्फूर्तीने सहभागी व्हावे, असे आवाहन थोरात यांनी या वेळी बोलताना व्यक्त केले.

आगाशिव डोंगर हा स्थानिक लोक आणि पर्यटकांसाठी खास आकर्षण ठरू लागला आहे. दररोज किंवा आठवड्याच्या अखेरीस शनिवार व रविवारच्या सुट्टीच्या दिवशी आगाशिव डोंगर भ्रमंतीसाठी येणाऱ्यांची संख्या लक्षणीयरीत्या वाढली आहे. आता या पर्यटकांचे समूह झाले असून, ते तिथे अनेक पर्यावरणपूरक कार्यक्रम घेत आहेत. वृक्षारोपणाचा संकल्प करीत आहेत. डोंगरावरील झाडांना सुरक्षा कुंपण घालणे. झाडांना आठवणी म्हणून नावे देणे, त्यांच्या सोबत छायाचित्रे काढणे, सेल्फी काढणे अशी मौज मज्जा मिळवत आहेत. मळाईदेवी शिक्षण संस्था वृक्ष लागवड, त्यांचे संगोपन व संवर्धनासाठी सतत अनेक उपक्रम राबवून विद्यार्थ्यांमध्ये त्याची जाणीव रुजवत आहेत. अशा उपक्रमातून आगाशिव डोंगराचे महत्व दिवसेंदिवस वाढत आहे.