कराड : सह्याद्रीच्या डोंगररांगांत वन्य प्राण्यांच्या शिकारीचे प्रकार अजूनही घडतच असून, वन विभागाने वसंतगडच्या पायथ्याला असलेल्या अबईचीवाडी (ता. कराड) येथे रानडुकराची शिकार झाल्याचा गुन्हा उजेडात आणला आहे. वन विभागाने रानडुकराचे अवशेष व मांस जप्त करताना, गावातीलच तिघांना ताब्यात घेतल्याची माहिती सहायक वनसंरक्षक महेश झांजुर्णे, ललिता पाटील यांनी दिली आहे.
संदीप संपत सुर्वे, प्रवीण शिवाजी सुर्वे आणि रामचंद्र ज्ञानू जाधव (तिघेही रा. अबईचीवाडी, ता. कराड) यांना वन विभागाने वन्य प्राणी रानडुकराची अवैध शिकार केल्याप्रकरणी ताब्यात घेतले आहे. अबईचीवाडीतील पांडुरंग किसन सुर्वे यांच्या शेतात वन्यप्राणी रानडुकराची शिकार झाल्याच्या मिळालेल्या गुप्त माहितीवरून ही कारवाई करण्यात आली. वन विभागाचे पथक घटनास्थळी दाखल होण्यापूर्वी सुगावा लागल्याने आरोपी पळून गेले.
आरोपींचा पाठलागही करण्यात आला; परंतु, ते मिळून आले नाहीत. यावर वनाधिकाऱ्यांनी कसून शोध घेतला आणि संदीप सुर्वे, प्रवीण सुर्वे आणि रामचंद्र जाधव यांना ताब्यात घेण्यात आले. या तिघांविरुद्ध वन्यजीव (संरक्षण) अधिनियम १९७२ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. वनक्षेत्रपाल ललिता पाटील यांच्या नेतृत्वाखाली वनपाल संतोष जाधवर, पूजा खंडागळे, रमेश जाधवर, सचिन खंडागळे व वन कर्मचाऱ्यांनी ही कारवाई यशस्वी केली आहे.
वन्यप्राण्यांची शिकार व अवयवांच्या तस्करीची माहिती कोणास मिळाल्यास टोल फ्री क्रमांक १९२६ यावर संपर्क साधावा, नजीकच्या वनक्षेत्रपाल कार्यालयास तत्काळ माहिती देण्यात यावी, असे आवाहन किरण जाधव (उपवनसंरक्षक, सातारा) यांनी केले आहे.